August 8, 2025

“३०० कोटींचा गूढ व्यवहार… पण माथाडी कायद्याची बदनामी थांबवा!” – डॉ.बाबा आढाव यांची स्पष्ट भूमिका

  • पुणे (अशोक आदमाने ) – मुंबईतील एका तथाकथित माथाडी कामगाराच्या नावावर ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याच्या वृत्तांमुळे खळबळ उडाली आहे.या गंभीर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी त्वरित व्हावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत केली.
    मात्र,या प्रकारामुळे माथाडी कायद्याची आणि माथाडी कामगारांची बदनामी होऊ नये, अशीही त्यांनी ठाम भूमिका मांडली.
    गैरप्रकाराला विरोध हीच महामंडळाची धोरणात्मक भूमिका ही स्पष्ट करताना डॉ.आढाव यांनी स्पष्ट केलं की,महामंडळ आणि राज्यभरातील संलग्न संघटना हमखास माथाडी कायद्याच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहेत.माथाडी क्षेत्रातील कोणताही गैरप्रकार,खंडणीखोरी किंवा अन्य भ्रष्टप्रवृत्तीविरुद्ध महामंडळाने नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.
    “आम्ही शांततामय आंदोलने, उपोषणं,मोर्चे काढून माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने आवाज उठवला आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच दत्ता पवार प्रकरणात न्यायालयीन चौकशीची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
    ३०० कोटींची संपत्ती जमवणाऱ्या दत्ता पवार या व्यक्तीविषयी माध्यमांतून आलेल्या माहितीनंतर, डॉ.आढाव यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत:
    दत्ता पवार हे कोणत्या माथाडी मंडळात नोंदणीकृत होते?,त्यांना दरमहा किती पगार मिळत होता?,त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होत असताना संबंधित मंडळांनी काय भूमिका घेतली?,राज्य माथाडी सल्लागार मंडळ या प्रकरणात मौन का बाळगते?
    या सगळ्या पार्श्वभूमीवर,उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी,अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
    त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, समाजातील कष्टकरी वर्गासाठी संजीवनी ठरलेला माथाडी कायदा काही शक्तींना असह्य होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत हा कायदा निष्प्रभ करण्याचे सुनियोजित षड्यंत्र सुरू आहे, अशी शंका महामंडळाने व्यक्त केली आहे.
    राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागात माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांचीही बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    या पत्रकावर साथी डॉ.बाबा आढाव (अध्यक्ष),साथी सुभाष लोमटे (सरचिटणीस – छत्रपती संभाजीनगर),डॉ.हरीश धूरट (उपाध्यक्ष – नागपूर),राजकुमार घायाळ (बीड),विकास मगदूम (सांगली),हुसेन पठाण (खजिनदार),हनुमंत बहिरट (सहचिटणीस – पुणे),
    अविनाश घुले (अहिल्यानगर),
    अप्पा खताळ (धुळे),शिवाजी शिंदे (पंढरपूर),रमझान पठाण (चंद्रपूर),
    शेख हसन काद्री (अकोला – संघटक),गोरख मेंगडे, संतोष नांगरे (पुणे),गंगाराम कोळेकर (धुळे),कृष्णात चौगुले (कोल्हापूर),
    हर्षवर्धन (लातूर) आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!