पुणे (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – जगभरात कौतुकास्पद ठरलेल्या व हमाल-कष्टकऱ्यांच्या जीवन रेखा ठरलेल्या माथाडी कायद्याच्या प्रश्नांमध्ये मी वैयक्तिक लक्ष घालेन, असे आश्वासन राज्यसभा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मजूर नेते डॉ. बाबा आढाव यांना दिले. पुण्यातील मोतीबाग येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या शिष्टमंडळासह डॉ.आढाव यांनी खा.पवारांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली. डॉ.आढाव यांनी स्पष्टपणे नमूद केले की,१९६९ साली अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यामुळे लाखो हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गास नियमित नोकरी, सामाजिक सुरक्षा व जीवनातील स्थैर्य लाभले.परंतु,सध्या काही मोठे मालक व कारखानदार या कायद्याला जाणीवपूर्वक नाकारत आहेत.साखर कारखान्यांमध्ये तर आजवर हा कायदा लागूच करण्यात आलेला नाही,हे वास्तव त्यांनी अधोरेखित केले. माथाडी मंडळांवर गेली १५-२० वर्षे राज्य शासनाने अंमलबजावणी थांबविल्यामुळे कामगार-मालक यांच्यातील संघर्षात वाढ होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. काही माथाडी कामगार गुन्हेगारी वर्तणुकीत अडकले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, मात्र संपूर्ण कायदाच बदनाम होऊ नये,याची दक्षता घेण्याची मागणी त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जिनिव्हा येथील परिषदेमध्येही माथाडी कायद्याची स्तुती करण्यात आली,याचा विशेष उल्लेख बैठकीत झाला.या कायद्याचा खर्च पूर्णपणे कामगारांच्या लेव्हीमधून केला जातो,शासनाकडून एक पैसाही खर्च केला जात नाही,हेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी खा.शरद पवार म्हणाले, “बाबा,हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही कशाला आलात? मला कळवलं असतं,तर मीच तुमच्याकडे आलो असतो.” तसेच त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला मुख्यमंत्र्यांना तत्काळ पत्र पाठविण्याच्या सूचना दिल्या. डॉ.आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सरचिटणीस सुभाष लोमटे,उपाध्यक्ष राजकुमार घायाळ,चिटणीस हनुमंत बहिरट, संघटक गोरख मेंगडे,प्रदीप इ. आणि साथी विकास मगदूम यांचा समावेश होता.
More Stories
मराठा समाज लग्न आचारसंहितेची टोणगे कुटूंबियानी केली सुरवात…..
माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे – ना.रामदास आठवले
पुणे विद्यापीठात पुन्हा तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना!