August 8, 2025

पंढरीच्या वारीत ‘अर्बन नक्षल’ असल्याचा वक्तव्य करणाऱ्या आ.मनीषा कायंदे यांचा महा.अंनिसच्या वतीने तीव्र निषेध

  • कळंब – महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आमदार मनीषा कायंदे यांनी “पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरले आहेत” असा बेछूट आणि निराधार आरोप करताना संविधान दिंडी,पर्यावरण दिंडी आणि इतर विवेकवादी संघटनांच्या दिंड्यांचा उल्लेख केला.त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा.अंनिस) तीव्र निषेध करते.
    हा केवळ संविधानाचा अपमान नसून,समतेचे,बंधुभावाचे आणि विवेकाचे जे विचार संतांनी मांडले आणि जपले,त्यांचा देखील अपमान आहे.महा.अंनिसने स्पष्ट केले की आ.कायंदे यांनी विधानमंडळातील मतप्रदर्शनाच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे.
    वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणारे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी,विवेकवादी,आणि विविध धर्मांमधील श्रद्धाळू सहभागी असतात.त्यांना “अर्बन नक्षल” ठरवणं हे संत परंपरेच्या आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.कीर्तनकार ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज,ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे चोपदार महाराज,तसेच इतर संतविचारांशी निष्ठा ठेवणाऱ्या अनेक कीर्तनकार व वारकरी देखील या दिंड्यांमध्ये सहभागी आहेत.
    महा.अंनिस मागील सात वर्षांपासून संविधान दिंडीत सहभागी होत आहे.“देव न मानणारे”असा आरोप करण्याआधी त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.हा केवळ वाऱ्यावर सोडलेला आरोप असून त्यामागे कोणतेही तथ्य नाही.संतांनी जातीव्यवस्थेविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध बंड करून विवेक, समता आणि बंधुतेचे विचार रुजवले.हाच विचार महा.अंनिस पुढे नेत आहे.या मूल्यांनाच “नक्षली” ठरवणं हे संतांच्या विचारांनाच अतिरेकी ठरवण्यासारखं आहे.
    त्याचप्रमाणे कायंदे यांनी सभागृहात ‘विशेष जनसुरक्षा विधेयक’ लवकरच येणार असल्याचा उल्लेख करत हे विधेयक संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यासाठी आहे, हे स्पष्ट केलं. या काळ्या मनुवादी विधेयकाचा महा.अंनिस जाहीर विरोध करते.
    महा.अंनिस राज्य अध्यक्ष माधव बावगे व राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी आ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेतील वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी,अशी मागणी केली आहे.
error: Content is protected !!