पुणे(अशोक आदमाने) – जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून व भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात दि.२२ एप्रिल २०२५ रोजी एक आगळावेगळा, समाजप्रबोधनात्मक विवाह सोहळा पार पडला. कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तुपसौंदरे यांची ज्येष्ठ सुकन्या राजनंदिनी व बाळकृष्ण खरात यांचे चिरंजीव संकेत यांचा व्यंकटेश लॉन्स भिगवन जिल्हा पुणे येथील विवाह सोहळ्यात दोन्ही परिवारांनी पारंपरिक भेटवस्तू,आहेर आणि फेटा बांधण्याऐवजी उपस्थित पाहुण्यांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देण्यात आले. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करत, जास्तीत जास्त नागरिकांनी संविधानाचे वाचन करावे हा या उपक्रमाचा उद्देश होता.तसेच, पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत पारंपरिक छापील पत्रिका न देता व्हाट्सॲपद्वारे डिजिटल आमंत्रण पाठवून प्रत्यक्ष फोनवरून संवाद साधण्यात आला. अनेकदा लग्न पत्रिकेवरील देवदेवतांचे फोटो लग्नानंतर रद्दीत टाकले जातात,यामुळे त्यांचा अपमान होतो.यासारख्या चुकीच्या प्रथांना बदलण्यासाठी व वेळ,पैसा वाचवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमात महाराष्ट्र राज्य चर्मकार समाज कार्याध्यक्ष नितीन शेरखाने,कळंब धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील,जिल्हा परिषद सदस्य शिवदास उबाळे व रामभाऊ दाभाडे,डी.वाय.एस.पी.पठाण (पुणे),मुख्य कार्यकारी अभियंता सुभाष शिरसागर,तसेच वैभव मुंडे (कळंब),संतोष कटके, रोहिदास गोरे,संतोष सातव, रशीद शेख,प्रदीप,सागर,दिनेश उबाळे,गणेश रोटे व इतर मान्यवर उपस्थित होते. वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांनी समाजातील अपप्रथांना दूर करून,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करत सामाजिक भान जपले.अशा उपक्रमांचा समाजात नक्कीच सकारात्मक संदेश जाईल.असे वऱ्हाडी मंडळातून चर्चा ऐकावयास मिळत आहे.
More Stories
जनसुरक्षा विधेयकाच्या आडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरवण्याचा सरकारचा प्रयत्न – सतीश काळे
“३०० कोटींचा गूढ व्यवहार… पण माथाडी कायद्याची बदनामी थांबवा!” – डॉ.बाबा आढाव यांची स्पष्ट भूमिका
पंढरीच्या वारीत ‘अर्बन नक्षल’ असल्याचा वक्तव्य करणाऱ्या आ.मनीषा कायंदे यांचा महा.अंनिसच्या वतीने तीव्र निषेध