August 8, 2025

लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ डॉ.बाबा आढाव यांचे उपोषण

  • पुणे – डॉ.बाबा आढाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे की,भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षातच संविधानाने दिलेल्या लोकशाहीला अनुचित आणि अनैतिक मार्गाने नख लावण्याचे कारस्थान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत केले गेले. या दरम्यान देशातील बिनीचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर भारतातील भ्रष्टाचाराबद्दल अमेरिकेत गुन्हे दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान त्यांना पाठीशी घालत आहेत. लोकशाही व संविधानिक मूल्यांवर ती टिकवण्याची जबाबदारी असलेल्या शासन संस्थेकडून जो हल्ला होत आहे. त्याच्या निषेधार्थ आणि नागरिकांच्या संवेदना व विवेक जागा करण्यासाठी डॉ.बाबा आढाव आणि त्यांचे सहकारी २८ नोव्हेंबर पासून आत्मक्लेश उपोषण करणार आहेत.असे त्यांनी ७५ व्या संविधान गौरव दिन समारंभात त्यांनी जाहीर केले.महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठान येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
    ते पुढे म्हणाले, ” १९५२ पासून च्या निवडणुका पहात आहे. त्याचा भाग राहिलो आहे. पण इतका खुला भ्रष्टाचार आपण पाहिला नाही. निवडणुकीच्या ऐन तोंडावर पैसे वितरित करण्याची सरकारी योजना जाहीर करणे . त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे. मतदान सुरू होण्याआधी आणि असताना कोट्यवधी रुपये मध्यस्थ व मतदार यांना वाटले गेले. निवडणूक आयोगाने जी रोख रक्कम आणि वस्तू पकडल्या. त्याचे जाहीर केलेले अधिकृत आकडेही शेकडो कोटींच्या घरात आहेत. याच दरम्यान अमेरिकेमध्ये देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर गुन्हे दाखल झाले.त्याचे पंतप्रधान खुलेआम समर्थन करत आहेत.ही देशाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. या सर्व प्रकारात संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा खून होत आहे. गेल्या दीर्घ काळापासून देशात जे सुरू आहे. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून आम्ही अतिशय अस्वस्थ आहोत. जे चाललंय त्याला मुक मूक राहून संमती आम्ही देऊ शकत नाही. त्याविरुद्ध बोलण्याचे बळ भारतीय संविधानाने दिले आहे. म्हणून आज संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी ही नैतिक जबाबदारी आम्ही घेत आहोत.भारतीय लोकशाही, संविधानातील मूल्य टिकवण्याची व संवर्धित करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांवरपण आहे. स्वतःच्या विवेकाला स्मरून आणि इतरांचा विवेक जागा व्हावा म्हणून २९ नोव्हेंबर महात्मा जोतिराव फुले स्मृती दिनापासून उपोषण करण्याचा निर्णय मी घेतला आहे. ही कृती उचित आणि आवश्यक आहे. असं ज्यांना वाटतंय त्यातील ज्यांना शक्य त्यांनी या उपोषणास सहभागी व्हावे. असे आवाहनही करत आहे. ” त्यास प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार हेही डॉ.आढाव यांच्यासह आत्मक्लेष उपोषण करणार आहेत.
    यावेळी ॲड.मोहन वाडेकर, नितीन पवार,हनुमंत बहिरट, चंदन कुमार,ओंकार मोरे, प्रकाश वाघमारे,शितल परदेशी, विजयानंद रांजणे,विजय जगताप, रमेश उणेचा आदी उपस्थित होते.
    यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन सर्वांनी केले. तसेच ७५ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानिक मूल्यांचे रक्षण व संवर्धन करण्याच्या जबाबदारीची सर्वांनी स्वतःला आठवण करून दिली.
error: Content is protected !!