September 21, 2026

त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी

  • लातूर – त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ७ फेब्रुवारी रोजी शहरात अभिवादनाचा उत्स्फूर्त कार्यक्रम पार पडला.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
    कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्रिसरण व पंचशील ग्रहण करून करण्यात आली. त्यानंतर माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव चिकटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेसही समितीतर्फे कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
    यावेळी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या प्रवासात रमाईंचे योगदान मोलाचे असून त्यांचा त्याग, संयम आणि समर्पण भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.अत्यंत कठीण परिस्थितीत संसार सांभाळत त्यांनी डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला दिलेला मूक पण भक्कम पाठिंबा हा इतिहासातील अमूल्य अध्याय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.दुश्यंत कटारे व भुजंग कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुशीलकुमार चिकटे यांनी केले. यावेळी नव्याने निवडून आलेले मनपा सदस्य विनय जाकते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांना त्रिसरण व पंचशील भंते बोधिराज यांनी दिले.
    या कार्यक्रमास राम कोरडे,वैभव गायकवाड,बाबासाहेब कांबळे, शेख चांद,दिगंबर गायकवाड, सिद्धांत चिकटे,गौतम साबळे, नामदेव गायकवाड,सुरेश भुताळे, पप्पू कांबळे,निखिल गायकवाड, चिंटू गायकवाड,निलेश बनसोडे, कैलास कांबळे,प्रवीण कांबळे,रवी कांबळे,मेजर राजाराम साबळे, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष आशा चिकटे,सुजाता अजनिकर तसेच समता सैनिक दलाचे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम राष्ट्रगीताने संपन्न झाला.
error: Content is protected !!