१८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विक्री – पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप
पुणे (अशोक आदमाने) – पुणे जिल्ह्यातील मुंढवा परिसरात महार वतनाच्या सुमारे ४३ एकर जमिनीचा तब्बल १८०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे.या जमिनीची विक्री केवळ ३०० कोटी रुपयांना करण्यात आल्याने दलित शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा आरोप करत पीडित दलित शेतकऱ्यांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आपल्या वेदना मांडल्या. शेतकऱ्यांनी सांगितले की, संबंधित जमीन पूर्वी सरकारने भाडेपट्ट्यावर दिली होती.मात्र, कोणतीही वैधानिक मान्यता न घेता आणि उच्च पातळीवरील संगनमताने ही जमीन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्यात आली. विशेष म्हणजे या व्यवहारावर तब्बल २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हे भ्रष्टाचार आणि अन्यायाचे ठळक उदाहरण आहे. ‘मी खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही’ म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी. ‘सबका साथ,सबका विकास’च्या घोषणेखाली हा अन्याय सुरू आहे का?” वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे की, ते या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा उभारतील. दरम्यान,वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन केले असून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
More Stories
अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महाविकास आघाडीची भव्य बाईक रॅली – प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाचा हुंकार
शिंदे सरकार प्रतिष्ठानाच्या संकेत शिंदे यांची पुणे जिल्हा संघटकपदी निवड
‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ