March 26, 2026

आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड

  • कळंब –आई-वडिलांच्या त्याग, कष्ट आणि संस्कारांमुळेच आपल्या अस्तित्वाची जडणघडण होते.समाजात यश,प्रतिष्ठा आणि ओळख मिळाली तरी आपल्या मूळ आधारस्तंभांचा कधीही विसर पडू नये.आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात कुटुंबसंस्थेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.आई-वडील हे केवळ जन्मदाते नसून जीवन घडविणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या कष्टांचे ऋण कधीही फेडता येणार नाही;मात्र आदर, प्रेम आणि जिव्हाळ्याने त्यांची काळजी घेणे हीच खरी कृतज्ञता होय,असे भावनिक व प्रेरणादायी प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केले.
    वत्सला बळीराम गायकवाड यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘आयु.वत्सलामाई आदर्श माता पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा नंदनवन बेघर निवारा केंद्र, लातूर येथे दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या वेळी वस्त्रदान व स्नेहभोजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र,शाल,फेटा,स्मृतिचिन्ह आणि पुष्पहार देऊन यथोचित गौरव करण्यात आला.पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये खादी ग्रामोद्योग संघ,कळंबच्या संचालिका रंजना सुभाष घोडके,समाजप्रबोधनकार ह.भ.प.सुनिता देवी आडसुळ महाराज,भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्या ज्योती विलास घारगावकर,प्रभावती दत्तात्रय दीक्षित भिसे (वाघोली), भारतीय बौद्ध महासभेच्या लातूर जिल्हाध्यक्षा आशाताई सुशिल चिकटे,आदर्श शेतकरी सुकुमार शिवाजी भिसे,गृहिणी ताहेरा मक्का सिकंदर,महिला
    परिचारिका रागिणी बाबासाहेब आल्टे,गृहिणी पार्वती पांडुरंग पानखडे तसेच एम.पी.एम.एस.ए. लातूर जिल्हाध्यक्षा गंगासागर सुरेश ढवळे यांचा समावेश होता.

  • कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.सुनील गायकवाड यांनी “आधुनिक युगातील श्रावणबाळ” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,आधुनिक जीवनशैलीमुळे तरुण पिढी यशाच्या शिखरावर पोहोचत असली तरी नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.हा दुरावा कमी करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि परस्पर संवाद अत्यावश्यक आहे.आई-वडिलांचा सन्मान राखला तरच समाज सुदृढ,सुसंस्कृत आणि संवेदनशील बनेल,असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
    कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा निकेतन विद्यामंदिर, लातूरच्या सहशिक्षिका इंदूताई बटणपूरकर,सेवानिवृत्त फौजदार व्यंकट कव्हाळे,महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा पाटील,ह.भ.प.महादेव आडसुळ महाराज,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ‘साक्षी पावनज्योत’चे अधिस्वीकृतीधारक संपादक सुभाष घोडके,प्रकाश घोडके, बौध्दाचार्य विलास घारगावकर, तसेच कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संस्थापक सचिव सुफी सय्यद शमशोद्दीन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.संयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
    कार्यक्रमाच्या शेवटी आई-वडिलांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करणारा संदेश देण्यात आला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन व्याख्याते सुरज मांदळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मेधावी सूर्यवंशी यांनी मानले.
error: Content is protected !!