August 8, 2025

जिल्ह्यातील संस्कृती प्रेमींनी महासंस्कृती महोत्सवात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे

  • * वेगवेगळे कला प्रकार,प्रदर्शने आणि संस्कृतीचे मनोरंजक सादरीकरण होणार
  • धाराशिव (जिमाका) -जिल्हयात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” अंतर्गत २९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल,धाराशिव येथे करण्यात आले आहे.
    विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यात करण्यात येत आहे.राज्यातील विविध भागातील संस्कृतीचे अदान, प्रदान,स्थानिक कलाकारासांठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे,लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन,स्वातंत्र्य लढयातील ज्ञात, अज्ञात लढवय्यांची माहिती इत्यादी बाबी सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवात जिल्ह्यातील कलासंस्कृतीप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.
    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैंनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव,उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,साहित्यिक युवराज नळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले की,या महोत्सवात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.वेगवेगळे कला प्रकार, प्रदर्शने आणि संस्कृतीचे मनोरंजन सादरीकरण यानिमित्ताने केले जाणार आहे.तेंव्हा सर्वांनी या महोत्सवाचा सहकुटुंब आनंद घ्यावा असेही ते म्हणाले.
    महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २९ फेब्रुवारी रोजी गोंधळ,भारुड, दिंडी नृत्य,पोवाडा,महाराष्ट्र गीत,भरत जाधव यांचे “मोरूची मावशी” हे नाटक तसेच पसायदान सादर केले जाईल.१ मार्च रोजी सागर चव्हाण यांचा संबळ “ साथ काळजाची काळजाला ” कवी संमेलन तसेच बासरी वादन,शिवचरित्र कथन,नृत्य, तबला जुगलबंदी याचा समावेश राहणार आहे.
    २ मार्च रोजी शाहीर राणा जोगदंड यांचा पोवाडा,परशुराम सातपुते यांचा वासुदेव,संतोष राऊत यांचे भारतीय संविधान जनजागृतीपर व्याख्यान,साहित्यिक युवराज नळे हे पर्यटन पुरातत्व माहितीपट सादर करणार.प्रा.डॉ.गणेश शिंदे व त्यांचा संच “रायगडला जेव्हा जाग येते ” हे नाटक सादर करतील.विशाल शिंगाडे यांचा जोगवा नृत्य आणि मानसी नाईक व त्यांचे सहकारी ” संस्कृती महाराष्ट्राची ” हा कार्यक्रम सादर करतील.
    ३ मार्च रोजी शशिकांत माने व त्यांचे सहकारी भीमगीत सादर करतील.प्रा.डॉ.सतीश कदम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.संजीवनी इंगळे व सहकारी मर्दानी खेळ सादर करतील.आनंद समुद्रे व संघ हे शास्त्रीय गायन सादर करणार आहे. सायंकाळी ४:३० वाजता युवराज नळे व इतर निमंत्रित गझलकार यांचा गजल व मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.संध्याकाळी ७ वाजता ” चला हवा येऊ द्या ” या कार्यक्रमात श्रेया बुगडे व कुशल बद्रिके यांच्या संघ हास्य नाटक सादर करणार आहे.
    ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता कांचन सोनटक्के प्रतीक्षा गुंडरे, सानिका खामकर,शुभम खोत, संस्कृती पाटील, प्रियांका लोखंडे काळे,प्रताप धावारे,पंचशीला ठेवले, सुलक्षणा टिळक व इतर कलावंत लावणी व गवळणीचे कार्यक्रम सादर करतील. प्रज्ञा मोरे यांच्या राणी येसूबाई हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.डॉ.उषा कांबळे व संघ हे ” महाराष्ट्राची लोकधारा ” हा कार्यक्रम सादर करतील.संध्याकाळी सूर बहार संगीत मैफिल आणि सुगम गायनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.रात्री ८ वाजता भार्गव चिरमुले व माधवी पवार यांच्याकडून जल्लोष सिनेतारकांचा हा कार्यक्रम सादर केला जाणारआहे. शेवटी केशव पाटील हे पसायदान सादर करतील.
    या महोत्सवात स्थनिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम,चित्र प्रदर्शन, शिवकालीन शस्त्रे आणि नाणी प्रदर्शन,धाराशिव येथील पुरातन स्थळे यांचे चित्रदालन तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले वस्तूचे स्टॉल असणार आहेत.तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात सामील होऊन कलाकारांना दाद द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
error: Content is protected !!