बोर्डा – कळंब तालुक्यातील बोर्डा गावातील फॉरेस्टच्या जमीनीत गवत काढण्याऐवजी तणनाशकाची फवारणी करून गवत जाळण्यात आले.या फवारणीमुळे त्याच भागात करण्यात आलेली वृक्षलागवडही नष्ट झाली.या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत,संबंधित वनपाल फरताडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी युवासेना महाविद्यालय कक्षाचे जिल्हा प्रमुख प्रशांत शेळके यांनी विभागीय वन अधिकारी,धाराशिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक २८७ मध्ये असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते. नियमानुसार हे गवत मजूरांच्या साहाय्याने काढणे अपेक्षित होते. शासन परिपत्रकानुसार अशा कामांसाठी मजूर नियुक्त करणे आवश्यक असून, त्यासाठी मजुरी दरही निश्चित केलेले असतात आणि निधीची तरतूदही केलेली असते. मात्र या ठिकाणी कोणतीही मजूर नियुक्ती न करता थेट तणनाशकांची फवारणी करून गवत नष्ट करण्यात आले. परिणामी, तिथे लागवड करण्यात आलेली वृक्षांची रोपेही जळून गेली. या प्रकारात अंदाजपत्रक न तयार करता,निधीचा चुकीचा वापर करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून जबाबदार वनपालावर कारवाई करण्यात यावी,अशी जोरदार मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावेळी युवासेना जिल्हा प्रमुख धाराशिव गणेश जगताप, उपजिल्हा प्रमुख आदित्य हंबीरे, जिल्हा सरचिटणीस निखील घोडके आदी उपस्थित होते.
More Stories
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला
“जनता दरबार” उपक्रमाद्वारे नागरिकांच्या तक्रारींना थेट जिल्हाधिकाऱ्यांची दाद