धाराशिव (जिमाका) – श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर देवीच्या जिर्णोद्धार प्रक्रियेचे धार्मिक दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन घेत भक्तिभावाने कार्यवाही सुरू आहे. या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे दिनांक १६ जून २०२५ रोजी काशीस्थित पद्मश्री प.पू. गणेश्वर द्राविड शास्त्री व ब्रह्मवृंद,तसेच महंत,पुजारीवर्ग, सेवेकरी,कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेले दुर्गासप्तशती संपुटीत अनुष्ठान होय. या विधीमध्ये वापरण्यात आलेली तलवार ही धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जाते.ही तलवार वाकोजीबुवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा यांच्याकडे पूजनासाठी सुपूर्त करण्यात आली असून, सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मठातच तिची नित्य पूजा केली जात आहे. दरम्यान,२ ऑगस्ट २०२५ रोजी काही प्रसारमाध्यमांद्वारे सदर तलवार चोरीस गेल्याची अफवा पसरविण्यात आली होती.मात्र,ती अफवा पूर्णतः निराधार,चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित तलवार संपूर्णपणे सुस्थितीत व सुरक्षित असून ती वाकोजीबुवा मठातच आहे,असे श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट कडून कळविण्यात आले आहे. तलवार चोरीच्या खोट्या बातम्यांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये,यासाठी अशी अफवा न पसरवण्याचे व त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
More Stories
बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड
नळदुर्ग येथील कन्या प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अनंत फुलसुंदर यांची निवड