रमेश होनराव यांचा अपघाती मृत्यू,अपघातप्रवण वळणांवर फलक लावण्याची मागणी तीव्र
कळंब ( परमेश्वर खडबडे) – कळंब – शिराढोण–लातूर या नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच आहे.विशेषतः वळणांवर कोणतेही इशारा फलक नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत कळंब येथील युवक रमेश होनराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रमेश होनराव हे दुचाकीवरून कळंबकडे येत असताना करंजकल्ला येथील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात गेली आणि त्यांच्या जागीच प्राण गमावले. लातूर-कळंब या महत्त्वपूर्ण राज्यमार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘हायब्रिड अन्युईटी’ या योजनेअंतर्गत सुरू असून यासाठी एकूण १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाच्या कळंब-राजणी हद्दीतील सुमारे ३० किमीचा भाग नव्याने डांबरीकरणात समाविष्ट आहे. या रस्त्यावरून मुरुड,अंबाजोगाई, लातूर यांना उत्कृष्ट जोडणी मिळते.मात्र,या डांबरीकरणासोबत सुरक्षा फलक,वळण चिन्हे,आणि चौकटीत पूर्वसूचना देणारी व्यवस्था न केल्याने हे रस्ते “मौत का कुवा” ठरत आहेत.
🌑धोकादायक वळणांचे ठिकाण – डिकसळ,करंजकल्ला,लोहटा (पूर्व),शिराढोण,ताडगाव या ठिकाणी वळणावर धोकादायक उतार व अरुंद पूल असून यामुळे अनेक अपघात घडले आहेत. काहींना जीव गमवावा लागला आहे,तर काहीजण कायमचे अपंग झाले आहेत.
🌑 सत्ताधाऱ्यांचे मौन व नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया – रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना,इतके गंभीर अपघात होऊनही या धोकादायक वळणांवर कोणताही चेतावणी फलक लावण्यात आलेला नाही. “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” “लोकप्रतिनिधी गप्प का?” अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या नागरिकांमध्ये उमटत आहेत.
🌑 घटनास्थळाचे वास्तव – सदर रस्त्यावर जुन्या पुलाजवळ जागा अरुंद आहे.४० फूट रुंदीचा रस्ता एका जुन्या पुलापाशी अचानक कमी होत असल्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात घडतो. या ठिकाणी फलक लावणे अत्यावश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 🛑 तातडीने उपाययोजना कराव्यात – धोकादायक वळणांवर इशारा फलक लावणे, अरुंद पूल रुंद करणे,आणि स्थानिकांशी संवाद साधून संरक्षक उपाययोजना करणे ही काळाची गरज झाली आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले