August 8, 2025

ॲड.वर्षाताई देशपांडे यांना “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५”; न्युयॉर्कमध्ये जागतिक सन्मान

  • बीड – स्त्रीभ्रूणहत्या,मुलींच्या सक्षमीकरणासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्री आणि दलित महिला विकास मंडळ, सातारा यांच्या सचिव तसेच लेक लाडकी अभियानाच्या मुख्य प्रवर्तक ॲड. वर्षाताई देशपांडे यांना “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५” या प्रतिष्ठेच्या जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना ११ जुलै २०२५ रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
    हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या भारताच्या केवळ तिसऱ्या महिला असून, याआधी १९८३ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि १९९२ मध्ये जे. आर. डी. टाटा यांना हा पुरस्कार मिळाला होता. तब्बल ३३ वर्षांनंतर भारताला हा सन्मान मिळणं, हे संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब असल्याचे लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.
    युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड हा पुरस्कार दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो. वर्षाताई देशपांडे यांना हा पुरस्कार लिंगनिवडीविरोधातील संघर्ष, बालविवाह निर्मूलन, मुलींचे सक्षमीकरण, कायदेशीर लढे, जनजागृती, व महिलांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये केलेल्या योगदानासाठी मिळाला आहे.
    त्या आजवर बालविवाह थांबवून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, महिलांना शेतजमिनीत सहमालकी हक्क मिळवून देणे, घरमालकीत महिला नावाची नोंदणी, लैंगिक भेदभावाविरुद्ध जनचळवळ उभी करणे, यांसारख्या उपक्रमांतून हजारो महिलांचे आयुष्य घडवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लेक लाडकी अभियानाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत महिलांच्या हक्कांबाबत प्रभावी जनआंदोलन घडवले.
    या पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. शैलजाताई जाधव, कैलास जाधव, तसेच दलित महिला विकास मंडळ साताराचे पदाधिकारी सहभागी होते.
    हा सन्मान म्हणजे केवळ वर्षाताईंच्या कार्याचा गौरव नसून, तो महाराष्ट्रातील महिलांच्या संघर्ष, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाचा जागतिक सन्मान आहे,असे प्रतिपादन बाजीराव ढाकणे यांनी केले.
error: Content is protected !!