धाराशिव – राष्ट्रीय महामार्ग व रस्ते सुरक्षेसंदर्भात सुरू असलेल्या कामांमधील हलगर्जीपणावर आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यांनी महामार्ग क्रमांक ५२ व शहर परिसरातील अपूर्ण कामांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले.त्यांच्या या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तात्काळ दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले. आमदार पाटील म्हणाले की, येडशी–संभाजीनगर महामार्गावर गुत्तेदारांकडून अंडरपास व उड्डाणपुलांची कामे मंजूर असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. धाराशिव शहरातील शाळेजवळील अंडरपासचे काम वेळेवर न झाल्यामुळे एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून यामागे कामातील दिरंगाई जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या २७ जानेवारी २०२५ रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा संदर्भ देत,त्यातील सूचना अद्याप राबवण्यात आल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खामकरवाडी परिसरात वाहनांचा वेग अत्यंत कमी होत असल्याने लुटमारीच्या घटना घडत आहेत. काही भागांत वेग अत्याधिक वाढतो तर काही ठिकाणी तो फारच कमी होतो,यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंदफळ, येडशी आणि धाराशिव शहरातील अर्धवट कामांबाबतही आमदार पाटील यांनी जबाब मागितला.
** यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, “आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे गंभीर आहेत.संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती घेऊन ज्या गुत्तेदारांनी कामे हाती घेऊनही सुरुवात केली नाही,अशा गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.आवश्यकता भासल्यास त्यांना ब्लॅकलिस्टही करण्यात येईल.” या ठिकाणी कामे मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावरून लक्ष दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती