धाराशिव – धोकादायक वर्गखोल्यासाठी निधीची कमतरता भासत आहे,शिवाय शाळेतील वीज बिल भरण्यासाठी कोणतीही तरतूद नाही या दोन्ही बाबीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात आवाज उठविला. त्यावर मंत्री पंकज भोईर यांनी निधीची तरतूद करु असं आश्वासन दिले. यावेळी आ.पाटील म्हणाले, धोकादायक वर्गखोल्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेचा सेस, जिल्हा नियोजन समितीतुन पाच टक्के निधी देण्याची तरतूद आहे. पण धाराशिव जिल्ह्यात धोकादायक वर्गखोल्याची संख्या 594 इतकी आहे.जिल्हा नियोजन समितीच्या पाच टक्केतुन फक्त 82 वर्गखोल्या झाल्या आहेत. मग उर्वरीत वर्गखोल्यात विद्यार्थ्यांनी धोकादायक खोल्यामध्येच शिकायचं का? राहिलेल्या 514 वर्गखोल्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. समग्र शिक्षण मधून ही काम होतील असं सांगितलं गेलं पण त्यांच्याकडूनही कामे झालेली नाहीत. तसेच शाळामध्ये ई लर्निंग ची सोय केली असली तर त्याला लागणारी वीज ही व्यावसायिक दराने आकारली जात आहे. ही आकारणी सवलतीच्या दराने उपलब्ध करावी तसेच या वीज बिलासाठी सुद्धा कोणतीही तरतूद नसल्याच आमदार पाटील यांनी निदर्शनास आणून दिली.यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, धोकादायक वर्गखोल्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करत आहोत पण तो पुरेसा नसल्याच वास्तव आहे. म्हणून यासाठी स्वतंत्र निधी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच वीजबिल दर हा व्यावसायिक पद्धतीने आकारला जाऊ नये असा शासनाने निर्णय घेतल्याच मंत्री भोईर यांनी सांगितले. वीजबिल भरण्याकरिता सुद्धा निधी उपलब्ध करू असं त्यानी सांगितलं.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला