August 9, 2025

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग – जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे

  • धाराशिव (जिमाका) – ग्रामीण भागातील महिलांना पापड, कुरडई,लोणच्यांसारखी पारंपरिक उत्पादने सहज उपलब्ध असतात,मात्र त्यांना योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.सध्या स्मार्टफोन आणि सोशल मीडिया सर्वत्र पोहोचले असून,महिलांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात व्हॉट्स अॅप ग्रुप, इंस्टाग्राम आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर करून व्यवसाय वाढवावा,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले.
    त्या ‘नवतेजस्विनी महोत्सव २०२५’ च्या समारोप कार्यक्रमात बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
    श्रीमती शेंडे म्हणाल्या,”महिलांनी स्थानिक पातळीपुरते मर्यादित न राहता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचा प्रचार करावा. चांगले फोटो आणि व्हिडिओ तयार करून जाहिरातीसाठी त्यांचा वापर करावा. तसेच,महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माविमच्या योजना मोठ्या मदतीच्या ठरत आहेत.”
    संजय गुरव यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन आणि स्थानिक ब्रँड विकसित करण्याचे महत्त्व सांगितले.”चिवडा,हुरडा,कडक भाकरी यांसारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची मोठी मागणी आहे. महिलांनी जिद्द,चिकाटी आणि कल्पकतेने व्यवसाय वाढवावा,” असे त्यांनी नमूद केले.
    जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक परंपरेचा उल्लेख करत “माविमने महिलांच्या सक्षमीकरणात मोठे योगदान दिले आहे.महिलांना नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाली असून,त्याचा उपयोग जिल्हा परिषद,पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचलेल्या महिलांनी प्रभावीपणे केला आहे,” असे सांगितले.
  • महिला उद्योजकांचे यशस्वी अनुभव
    माविमच्या साहाय्याने व्यवसाय वाढवलेल्या काही महिलांनी यावेळी आपले अनुभव सांगितले.अनिता स्वामी (उमरगा) – “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून कर्ज मिळाल्याने बाजरी-ज्वारीच्या कडक भाकरीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळाले. “चैत्राली गुरव (आलुर) – “बचत गटाच्या मदतीने आयसीआयसीआय बँकेचे कर्ज घेतले आणि गुलाबाच्या फुलांची रोपवाटिका सुरू केली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत झाली.”निलावती कांबळे – “१६ हजार रुपयांचा माल विक्री करून चांगला फायदा झाला.”
  • कार्यक्रमात माता सावित्री लोकसंचलित साधन केंद्र (धाराशिव), ज्ञानदीप (उमरगा),नवप्रभा (कळंब), समता (परंडा),नवस्त्री निर्माण (ढोकी),संज्योत (दाळींब) या केंद्रांच्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा कुलकर्णी यांनी केले,सूत्रसंचलन स्वप्नाली झाडे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर टोंपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध लोकसंचलित साधन केंद्रांचे संचालक,व्यवस्थापक, लेखापाल, उपजीविका सल्लागार,सहयोगिनी, समुदाय साधन व्यक्ती आणि माविम कार्यालयाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!