August 9, 2025

धाराशिव येथे ‘जय शिवाजी,जय भारत’ पदयात्रा

  • धाराशिव (जिमाका)- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर ‘जय शिवाजी,जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार,१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता ही पदयात्रा एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणार आहे.
    धाराशिव जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून,सुमारे ३ हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.
    ही पदयात्रा धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. जिल्ह्याच्या विविध भागांतील शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद,शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास,त्यांचे पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
    या भव्य आयोजनाला धाराशिव जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यात खासदार,सर्व आमदार,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक आणि निवासी जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,शालेय विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.
error: Content is protected !!