कळंब – दि.२७ फेब्रुवारी रोजी वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत कळंब येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.मराठी विषयाच्या अध्यापिका प्रतिभा रामचंद्र गांगर्डे (भवर) यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी आणि वाचन संस्कार वाढविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. “वाचन संस्कार सावित्रीचा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल १५० विविध प्रकारची पुस्तके भेट देण्यात आली.१ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अवांतर वाचन मोहिमेत सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या कु.प्राची सिरसाठ व कु.श्रावणी शिंदे यांना पुरुषोत्तम खेडेकर लिखित ‘शिवचरित्र’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत,समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे (भवर),तसेच सहशिक्षिका म्हेत्रे,मोहिनी माने,थोरात,साचणे, सहशिक्षक परमेश्वर मोरे,राऊत, ठाकूर,गोरे,तोडकर,ढेपे,बन्सी सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन थोरात यांनी केले.
तसेच विविध नामवंत व्यक्तींची माहिती संकलित करून तिचे वाचन करणाऱ्या आणि त्यावर प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना झाडांच्या बियांचे बक्षीस देण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश मिळविले.सुमारे ५० विद्यार्थ्यांना पेन देऊन गौरविण्यात आले. याशिवाय वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवन व साहित्यावरील माहितीचे वाचन करून त्यावर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. मराठी शब्दसंपत्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध स्पर्धा,वाचन उपक्रम आणि सन्मान सोहळ्यामुळे शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात आणि ज्ञानमय वातावरणात साजरा झाला.
More Stories
कळंब नगर परिषदेच्या ७२ कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी
डीजे-डॉल्बी मुक्त रामनवमीचा संकल्प;अध्यक्षपदी प्रसन्न हुलसुरकर यांची धुरा
संत गाडगे महाराज जयंतीतून समाजसेवेचा संकल्प दृढ