कळंब – कळंब नगर परिषद अंतर्गत आगामी आर्थिक वर्ष २०२६-२०२७ साठी सादर करण्यात आलेल्या ७२ कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पास संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत देण्यात आली.सदर अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नगर परिषद सभागृहात झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून वार्षिक उत्पन्न व खर्चाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये नागरी मूलभूत सुविधा,पायाभूत विकासकामे, स्वच्छता व आरोग्य सेवा, पाणीपुरवठा,सांडपाणी व गटार व्यवस्था,रस्ते विकास,विद्युत सुविधा,सार्वजनिक मालमत्तेची देखभाल तसेच विविध सामाजिक व विकासात्मक योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पावर सभागृहात सखोल चर्चा करण्यात आली. सदस्यांनी विविध सूचनांचा विचार करत नगर परिषदेच्या आर्थिक शिस्तीला प्राधान्य देत हा अर्थसंकल्प शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. चर्चेनंतर कोणताही विरोध नोंदविला न जाता उपस्थित सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी एकमताने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष लखनजी गायकवाड,मुख्याधिकारी मंजुषा गुरमे,शिवसेना पक्ष गटनेते अतुलजी कवडे,विरोधी पक्ष गटनेते संजयजी मुंदडा तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका आणि संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “७२ कोटींचा हा वार्षिक अर्थसंकल्प शहराच्या विकासाचा दिशादर्शक ठरणार असून नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत सर्व कामे पारदर्शक आणि वेळेत पूर्ण केली जातील.” मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि आर्थिक नियमांचे पालन करून विकासकामे राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. सन २०२६-२०२७ च्या ७२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी मिळाल्याने नगर परिषद अंतर्गत प्रस्तावित विविध विकासकामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून शहराच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे.या निर्णयामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
More Stories
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात विविध उपक्रमांची मेजवानी
डीजे-डॉल्बी मुक्त रामनवमीचा संकल्प;अध्यक्षपदी प्रसन्न हुलसुरकर यांची धुरा
संत गाडगे महाराज जयंतीतून समाजसेवेचा संकल्प दृढ