धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – धाराशिव जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ११ (१) व कलम ४५ (२) तसेच संबंधित नियमांनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दि.१३ मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेचे अध्यक्षस्थान किर्ती किरण पुजार,जिल्हाधिकारी धाराशिव हे भूषविणार आहेत. तेच या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या दि.०९ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे “सर्वसाधारण महिला” प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.त्यामुळे या पदासाठी महिला सदस्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सदर विशेष बैठकीत सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकृती होणार आहे.दुपारी २.०० वाजता सभा सुरू होऊन नामनिर्देशनपत्रांची तपासणी,छाननी,उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडेल. आवश्यक असल्यास प्रथम अध्यक्षपदासाठी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात येईल.त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी सर्व निर्वाचित सदस्यांना नियमानुसार नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बैठकीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीचा इतिवृत्तांत त्याच दिवशी पूर्ण करून शासनास सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक सदस्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान