February 27, 2026

कॅथलॅब,एमआरआय व ५०० बेड रुग्णालय तातडीने सुरू करा — आमदार कैलास पाटील

  • धाराशिवच्या आरोग्य सुविधांना राजकीय स्थगितीचा अडथळा;
  • धाराशिव– जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.स्थगितीच्या राजकारणामुळे रखडलेले कार्डियाक कॅथलॅब, एमआरआय मशीन आणि ५०० बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने पूर्ण करून सुरू करावे, अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.
    विधानसभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की,सध्या केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.धाराशिव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्डियाक कॅथलॅब नसल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे.ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोग्य विभागाने सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून एक वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती.ऑक्टोबर २०२४ पर्यंत कॅथलॅब सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
    दहा बेडचे हॉस्पिटल व कार्डियाक कॅथलॅब मंजूर असूनही सुविधा सुरू नसल्याने रुग्णांना सोलापूर येथे हलवावे लागत आहे.‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. ट्रान्सफॉर्मर व जनरेटरसाठी आवश्यक निधीला स्थगिती मिळाल्यामुळे उभारणी रखडल्याचेही त्यांनी सांगितले. २०२५-२६ मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली.
    दरम्यान,धाराशिवसाठी मंजूर असलेली एमआरआय मशीन सरकार बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा प्रयत्न झाला होता.मात्र,स्थानिकांच्या तीव्र आंदोलनामुळे मशीन धाराशिवमध्येच ठेवण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही केवळ कमिशनरच्या सहीअभावी एमआरआय सेवा सुरू झालेली नाही.परिणामी रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
    तसेच धाराशिवमध्ये मंजूर ५०० बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे कामही रखडले आहे.सुरुवातीला निधीची तरतूद नसल्याने प्रकल्प प्रलंबित राहिला.सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी मंजूर झाला, तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.जिल्ह्याच्या दृष्टीने हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून काम तातडीने सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
    जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रकल्प पूर्ण करावेत,अशी एकमुखी मागणी आता नागरिकांमधूनही होत आहे.
error: Content is protected !!