August 8, 2025

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयामध्ये भविष्य घडवावे – सचिन काळे

  • डिकसळ (राजेंद्र बारगुले ) – ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची गरज असून यशस्वी जीवनासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयामध्ये भविष्य घडवावे असे प्रतिपादन डिकसळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच सचिन काळे यांनी केले.
  • भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.२६ जानेवारी २०२५ रोजी क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सुपूर्द करत असलेल्या प्रतिमेचे भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते पूजन करून भारतीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते करण्यात आले.

  • या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सचिन काळे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्याचा सल्ला दिला.
    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य सतिश मातने यांनी भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, “भारतीय संविधानाची निर्मिती ही एक ऐतिहासिक आणि महत्त्वाची प्रक्रिया होती,ज्यामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांच्या दृष्टीकोनामुळेच आपण एक सर्वसमावेशक संविधान प्राप्त करू शकलो.”
    प्राचार्य मातने यांनी सांगितले की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या निर्मितीत विविधतेत एकता,सामाजिक न्याय,आणि समानतेच्या मूल्यांना महत्त्व दिले.त्यांच्या विचारसरणीमुळे भारताला आधुनिक आणि प्रगतिशील राष्ट्र बनवण्याचा पाया रचला गेला.”

  • या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब धाकतोडे,डिकसळ ग्रामपंचायत सदस्य महादेव अंबिरकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी अभिषेक यादव यांनी गीत सादर केले तर प्रशिक्षणार्थी प्रथमेश आंबिरकर,छात्राध्यापिका स्नेहल खोडसे,प्रीती महाद्वार,साक्षी कवडे यांनी मनोगत व्यक्त केली.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके तर आभार निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी मानले.
    यावेळी प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक राजकुमार शिंदे,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे,सोनाली ढमाले व सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!