लातूर ( दिलीप आदमाने ) – “केवळ डिग्री मिळवणे महत्त्वाचे नाही,तर जीवनातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाऊन कुटुंबासाठी आधार बनणे हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा. विक्रम काळे यांनी केले. शहरातील एमआयडीसी परिसरातील जिजामाता नर्सिंग स्कूल येथे ‘एएनएम’ आणि ‘जीएनएम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, “कोरोना काळात परिचारिकांची खरी गरज समाजाला समजली.ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून पाच वर्षांपूर्वी जिजामाता नर्सिंग स्कूल सुरू करण्यात आले. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ डिग्री न मिळवता आयुष्याच्या परीक्षेतही यशस्वी व्हावे आणि आई-वडिलांची सेवा करावी.” या प्रसंगी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे,गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉ.रमेश भराटे, समन्वयक प्रा.डॉ.संतोष जोहरी, प्राचार्य देविदास कोल्हे,अधीक्षक भाऊसाहेब लाकाळ,प्राचार्या पूजा मोरे,प्रा.दत्ता मुंडे,प्रा.बाबासाहेब सोनवणे,नुसरत कादरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्राचार्य डी.एन.केंद्रे यांनी परिचारिकांचे कार्य विशद करताना सांगितले, “डॉक्टर उपचार करून पुढे जातात पण परिचारिका रुग्णांची २४ तास काळजी घेत असतात. त्यांनी कोरोना काळात रुग्णांना आईच्या मायेने सेवा दिली.” डॉ.रमेश भराटे यांनी सांगितले की, “जगभरात पात्र परिचारिकांची मोठी मागणी आहे.नर्सिंग हे केवळ व्यवसाय नव्हे तर सेवा भावनेने युक्त असलेले क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी सेवा व समर्पण भावनेने कार्य करावे.” कार्यक्रमाची सुरुवात फ्लोरेन्स नाइटिंगेल व स्व.वसंतराव काळे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविक डॉ.संतोष जोहरी यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्या पूजा मोरे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सुमित यादव यांनी मानले. कार्यक्रमास नर्सिंग स्कूलचे शिक्षकवृंद,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने शालेय चित्रकला स्पर्धा संपन्न