August 8, 2025

पत्रकार लक्ष्मण पवार यांचे दुर्दैवी निधन

  • मुरबाड – होमगार्डची ड्युटी सांभाळून पत्रकारिता करणारे मुरबाडचे नामवंत पत्रकार लक्ष्मण चाहू पवार यांचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारी होमगार्ड म्हणून बंदोबस्तासाठी मुरबाड पोलीस ठाण्यात हजर होताना ही दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील विविध दैनिकांमध्ये पत्रकार म्हणुन लक्ष्मण पवार हे मुरबाडची जबाबदारी सांभाळत होते.सामाजिक बांधिलकी जपताना ते होमगार्ड म्हणुन देखील पोलीस खात्याला सहकार्याची भूमिका बजावत होते.पत्रकारिता सांभाळून ते पोलीस खात्यासोबत विविध ठिकाणी बंदोबस्तावर असायचे. निवडणुका,विविध सण,मोर्चे व आपत्कालीन परस्थितीत त्यांची होमगार्ड म्हणुन चोख कामगिरी होती. रविवारी ते ड्युटीवर मुरबाडकडे येताना गोवेली नजीक त्यांच्या छातीत दुखू लागले व यातच त्यांची
    प्राणज्योत मालवली. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पत्रकारितेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. एका गुणी पत्रकाराला व चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष होमगार्डला तालुका मुकला आहे,अशा प्रतिक्रिया त्यांच्या जाण्याने समाजात व्यक्त होत आहेत.
    पवार हे रात्री,बेरात्री, आपत्कालीन परस्थितीत होमगार्ड म्हणुन चोख व नियमित कर्तव्य बजावत होते.दिवसा पत्रकारिता करणे व रात्री बंदोबस्ताची ड्युटी बजावणे यात कदाचित त्यांचा कामाच्या तणावामुळे हा प्रकार घडला असावा अशी मतं यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहेत. होमगार्ड पोलीस बळाला सोबत म्हणुन मोलाची भूमिका बजावत असतात, हीच भूमिका बजावत असताना पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. पवार हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय पत्रकार होते,त्यांच्या जाण्याने चळवळीचीही हानी झाल्याच्या दुःखद प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीत व्यक्त होत आहेत. यावेळी होमगार्डच्या मुरबाड युनिट तर्फ त्यांना मानवंदना देण्यात आली.त्यांच्या अंत्यसंस्कार समयी तालुक्यातील मान्यावर,पत्रकार,सामाजिक, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.पवार हे कर्तव्य चौख बजावणारे होमगार्ड होते.ते स्वतः डयुटी मागून घ्यायचे,व ती प्रामाणिक पार
    पाडायचे.
error: Content is protected !!