धाराशिव- सध्या मुलींवरील अत्याचार,लैंगिक शोषण, छेडछाड अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचा विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून व सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याबाबतचे आदेश देण्यात यावे,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आझाद पाशाभाई शेख यांनी निवेदनाद्वारे (दि.२८) जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,सध्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.अनेक शाळा, महाविद्यालयामध्ये मुलींची छेडछाड, रोडरोमियोपासून महिला व महाविद्यालयीन मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे प्रकरण घडल्यानंतर संबंधित शाळा व महाविद्यालयाकडून आपल्या शाळेची व महाविद्यालयाची बदनामी होवू नये म्हणून प्रकरण दाबले जाते. अशा प्रकरणामुळे अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी शाळेत येण्यास घाबरत आहेत. तरी आपल्या स्तरावरुन सर्व शाळा व महाविद्यालय येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच रोडरोमियोंना आळा घालण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात व मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास अशा घटना रोखण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे सैनिक आझाद पाशाभाई शेख,अनिकेत शेख,ओम कांबळे,शंकर हुलगुंडे, अर्जुन चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, दत्ता गिरी,अमोल जमदाडे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला