लातूर – महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई द्वारा दि. 12 जुलै 2024 रोजी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. ही योजना समाजातील गरजू महिलांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची आहे त्यामुळे या शासकीय योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी होऊन त्यामध्ये गरजू महिलांना लाभ होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणाताई होनराव यांनी केले. महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर, श्री महात्मा बसेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (समाजकार्य विभाग), लातूर आणि श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजने अंतर्गत गरजू महिलांची नोंदणी शिबिर उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, मनोज सूर्यवंशी, अभिजीत चौंडा, बलराम खांडेकर, प्रा. आशिष स्वामी, प्रा. शहापुरे के.एस आणि नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या स्तुत्य योजनेची समाजातील सर्वसामान्य महिलांना माहिती देण्यासाठी समाजकार्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी दि. 12 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय संपूर्णपणे वाचावा. त्यामध्ये दिलेल्या तरतुदीची माहिती कुटुंबातील महिलांना द्यावी आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा नोंदणी अर्ज आपल्या मोबाईलवर भरून घ्यावा. तसेच महिलांना आवश्यक कागदपत्राची सुद्धा सविस्तर माहिती द्यावी त्यामुळे ही योजना आपल्याला यशस्वीरित्या राबवता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आमच्या महाविद्यालयातील समाजकार्य विभागाला सहभागी करून घेतल्याबद्दल उपस्थितांचे त्यांनी आभार मानून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष स्वामी यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिनेश मौने, डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. रत्नाकर बेडगे आणि शुभम बिराजदार यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजकार्य विभागातील विद्यार्थी स्वयसेवक सुद्धा उपस्थित होते.
More Stories
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार