April 25, 2026

आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा

  • २३.७५ कोटींच्या निधीतून ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारणी
  • धाराशिव (जिमाका)– जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उभारण्याचे मोठे काम सुरू आहे.कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहत असलेल्या रुग्णालये,क्रिटिकल केअर युनिट्स आणि आधुनिक प्रयोगशाळांमुळे केवळ उपचारच नव्हे,तर हजारो रुग्णांना आशा निर्माण होत आहे.ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी,या उद्देशाने ही व्यापक आरोग्य पायाभूत सुविधा उभारणी सुरू आहे.
    जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव यांच्याअंतर्गत आरोग्य विभागामार्फत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत.प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM-ABHIM) अंतर्गत सुमारे २३.७५ कोटी रुपयांच्या निधीतून ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारले जात असून,८ जानेवारी २०२४ रोजी भूमिपूजन करून बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे.या युनिटमध्ये MRI,ICU,HDU,आयसोलेशन वॉर्ड, डायलिसिस,ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन सेवा आणि पॉइंट ऑफ केअर लॅब अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.यापूर्वी जिल्ह्यात उपलब्ध नसलेल्या या सेवा आता स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याने आयसीयू खाटांची कमतरता दूर होणार आहे.
    याचबरोबर,धाराशिव येथे १० खाटांचे कार्डीयाक कॅथलॅब उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी सुमारे २३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास येत असून लवकरच हृदयविकार रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच १०० खाटांचे MCH विंग रुग्णालय उभारण्याचे काम २२.२३ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असून मातांसाठी व नवजात बालकांसाठी विशेष आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
    प्रयोगशाळा सुविधांमध्येही मोठी भर पडत असून,IPHL (Integrated Public Health Laboratory) साठी १.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या प्रयोगशाळेमुळे डेंग्यू,मलेरिया, AIDS,क्षयरोग तसेच विविध जैवरासायनिक व हिस्टोपॅथॉलॉजी चाचण्या जिल्ह्यातच मोफत उपलब्ध होणार आहेत.बालकांच्या आरोग्यासाठी DEIC (District Early Intervention Center) अंतर्गत जन्मजात दोष,पोषण कमतरता,विकासात्मक अडचणी यांचे निदान व उपचार केले जात आहेत,ज्यामुळे बालकांच्या आरोग्य संवर्धनाला मोठी चालना मिळत आहे.
    ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.परंडा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांपर्यंत उन्नत करण्यात येत असून,४३.८६ कोटी रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे.तसेच शिराढोण,भूम,वाशी,वालवड आदी ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
    वाशी व अनाळा येथे ट्रोमा केअर युनिट्स उभारण्यात येत असून आपत्कालीन सेवांना बळ मिळणार आहे.ढोकी व येडशी येथेही नवीन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ५०० खाटांचा जिल्हा रुग्णालय प्रकल्पही मंजूर झाला असून,३६१.५ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
    याशिवाय तुळजापूर व उमरगा येथे CT Scan सेवा सुरू करण्यात आली असून,MRI सेवा देखील लवकरच सुरू होणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे धाराशिव जिल्हा आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून,ग्रामीण भागातील नागरिकांनाही दर्जेदार उपचार सहज उपलब्ध होत आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमुळे “आरोग्य सेवा आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
error: Content is protected !!