April 29, 2026

“भूमिपुत्रांचा संयम संपत चालला” — आगरी सेनेचा रास्ता रोकोचा इशारा – कैलास पाटील

  • मुंबई/पालघर ( सतीश पाटील) – पालघर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांवरील अन्यायाविरोधात आगरी सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या नेतृत्वाखाली केळवे येथे पार पडलेल्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
    या बैठकीस कार्याध्यक्ष चंदुलाल घरत,सरचिटणीस मेघनाथ पाटील,कामगार नेते प्रदीप साळवी तसेच महाराष्ट्र कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.साहित्यिक संजय पाटील मायखोपकर यांनी जिल्हाध्यक्ष चेतन गावंड यांच्याशी संवाद साधत प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख समस्या मांडल्या.
    बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे विठ्ठलवाडी,मांडे,शिल्टे,विराथन, जलसार व टेंभीखोडावे या भागांतील नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.या परिसरात आगरी,कोळी,आदिवासी व बौद्ध समाजाची मोठी वस्ती असून त्यांच्या जीवनमानावर प्रकल्पाचा विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले.
    पाणीटंचाई,धोकादायक वाहतूक, पाण्याच्या टाकीला पडलेल्या भेगा,प्रदूषण,बंधाऱ्याचे नुकसान, अपुरा मोबदला,कथित भ्रष्टाचार, स्फोटांमुळे घरांचे नुकसान, बोअरवेल बाधित होणे तसेच जमिनींच्या वापरातील अनियमितता अशा अनेक गंभीर तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
    एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची कथित मनमानी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    रास्ता रोकोचा इशारा :
    “शेतकरी व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आता रास्ता रोको आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही,”असा इशारा आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिला.त्यांनी सर्व भूमिपुत्रांना एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले.
    स्थानिक पातळीवर वाढत चाललेला असंतोष लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावेत,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!