धाराशिव – धाराशिव शहरात शनिवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहरातील जुना बस डेपो भागात पारधी समाजाच्या वस्तीमध्ये अनेक घरांवरील पत्रे उखडल्यामुळे गोरगरीब कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. या नुकसानीची महसूल प्रशासन तसेच आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने रविवार, 26 मे रोजी पाहणी करण्यात आली.
पारधी वस्तीमधील बहुतांश कुटुंब पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करतात. शनिवारी जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. वार्याच्या प्रचंड वेगामुळे पारधी वस्तीमधील झाडे उन्मळून पडली. अनेक घरावरील पत्रे उखडून गेले. पत्र्यावरील दगड घरामध्ये कोसळले. पत्रे उखडून गेल्यामुळे पावसाचे पाणी घरात साचून अन्नधान्य, कपडे यासह संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. तर राजू पवार यांच्धा घरावरील पत्रे उखडून पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सुमारे 40 घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या नुकसानीची तहसीलदार मृणाल जाधव, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. धनंजय झाकर्डे व त्यांच्या सहकार्यांनी पाहणी केली.
शनिवारी सायंकाळी या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पंचनामे करण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे सकाळी पुन्हा पंचनामे करण्यात आले. निसर्गाच्या प्रकोपामुळे पशुपालन, मोलमजुरी करुन उपजीविका करणार्या कुटुंबाचा संसार उदध्वस्त होऊन मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. धनंजय झाकर्डे, सहायक प्रकल्प अधिकारी श्री. विशाल सरतापे, कार्यालयीन अधिक्षक, श्री. मंगेश शिंदे, लिपिक श्री. युवराज चंदनशिवे आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, तलाठी श्री.बालाजी लाकाळ, कोतवाल श्री. श्रीकांत शेवाळे उपस्थित होते.
तातडीने पंचनामे पूर्ण करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठविणार – जाधव वादळी पावसाने पारधी वस्तीमधील घरांच्या झालेल्या नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करुन आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे तहसीलदार मृणाल जाधव यांनी सांगितले.
भरीव मदतीसाठी प्रस्ताव दाखल करणार- झाकर्डे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पारधी समाजाच्या घरांच्या महसूल प्रशासनाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या आधारे आदिवासी विकास विभागाकडे भरीव मदतीसाठी प्रस्ताव दाखल करणार आहोत, अशी माहिती नुकसानीच्या पाहणीनंतर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. धनंजय झाकर्डे यांनी दिली.
आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा – काळे पारधी कुटुंबांचे वादळाने झालेले नुकसान मोठे आहे. त्यांना महसूल प्रशासनाकडून मदत मिळाली तरी आणखी मदतीची गरज आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडेही पाठपुरावा करणार असल्याचे आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला