February 8, 2026

दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान

  • मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
    राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,पूर्वी दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.तसेच, दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी मतमोजणी आता दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
    राज्य निवडणूक आयोगाने दि.१३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे,छाननी,नामनिर्देशनपत्र मागे घेणे,चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मात्र, मतदान,मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत.
    दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेसाठी ३१ जानेवारी २०२६ नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.परंतु,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि.२८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने दि.२८ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला.या कालावधीचा विचार करून निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
    सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना संबंधित जिल्हाधिकारी दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील.
    सुधारित वेळापत्रकानुसार दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होणार आहे. तसेच दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.
    निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील,अशी माहिती आयोगाने दिली.
error: Content is protected !!