August 8, 2025

लोकशाहीचे बुरुज ढासळत आहेत;नागरिकांनी सावध व्हावे – डॉ.जयसिंगराव पवार

  • लातूर (दिलीप आदमाने ) – भारतीय लोकशाही मजबूत किल्ल्या सारखी आहे,परंतु सध्या तिच्यावर तोफाचे हल्ले चालू आहेत, तिचे बुरुज ढासळत आहेत. यामध्ये अनेक सुरंग पेरली जात आहेत. पण भारतीय संविधान आणि नागरिकांमध्ये हे सर्व काढून टाकण्याचे सामर्थ्य आहे. नागरिकांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी सावध होणे आवश्यक आहे असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार आणि इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांनी विचारशलाका त्रैमासिकाच्या “भारतीय लोकशाही: आव्हाने आणि भवितव्य” या अशोक चौसाळकर गौरवांकाचे विमोचन करताना प्रतिपादन केले.
    शिवाजी विद्यापीठ, राज्यशास्त्र परिषद, कोल्हापूर, विचारशलाका त्रैमासिक आणि द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शाहू स्मारक भवनातील मिनी सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतातील ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीचे सेवानिवृत्त प्रा. डॉ.गोपाळ गुरु, महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
    याप्रसंगी प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सपत्नीक कुलगुरू डॉ.शिर्के यांच्या शुभ हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
    पुढे बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, धर्मनिरपेक्षता लोकशाहीचा आत्मा आहे. भारतीय राष्ट्रवादाची मांडणी धर्माच्या नव्हे तर संविधानाच्या अंगाने केली पाहिजे तरच लोकशाहीचे संवर्धन होऊ शकेल. राष्ट्रवादाची मांडणी धर्माच्याआधारे केल्यास खरी लोकशाही निर्माण करता येणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला चांगले नेतृत्व दिले पण त्यांनी कधीही विरोधक मुक्त भारत अशी घोषणा केली नाही. अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने देश चालविला. पण सध्या विरोधकासह लोकशाही संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. जो धोकादायक आहे. आज धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. जनता भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या मागे वाहत जात आहे. यामुळे नागरिकांनी व तरुणांनी वेळीच सावध होऊन लोकशाहीचे संवर्धन केले पाहिजे. लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आज ठणकावून सांगितले पाहिजे की जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत आम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भारतातील ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. गोपाळ गुरु म्हणाले की, सध्याची राजकारणाची स्थिती मूल्यहीनतेकडे वाटचाल करीत आहे. राजकीय नेते बेलगाम व नीतीहीन झाले आहेत. आज आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे की काय? अशी शंका येते. आज लोकशाही संकटात आहे. फॅसिझम सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे लोकशाही व संविधान वाचविणाऱ्याच्या मागे सर्वांनी उभे राहणे आवश्यक आहे. प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. चौसाळकर यांनी आयुष्यामध्ये कधीही स्वतःच्या वैचारिक भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी अस्सल जीवन कसे जगावे याची सर्वांना शिकवण दिली आहे. ते कठीण विषय देखील सोप्या भाषेत मांडतात. संयमी आणि शांत पद्धतीने मांडलेले विचार समाजावर खोल परिणाम करीत असतात. ही त्यांची चिंतन व अभिव्यक्ती शैली सर्वांनी घेण्याजोगी आहे.
    याप्रसंगी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ म्हणाले की, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्रज्ञ म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढेच ते माणूस म्हणून देखील मोठे आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व सकारात्मक आहे. त्यांना साहित्य आणि संगीतामध्ये अभिरुची आहे. यातील त्यांची समज अचंबित करणारी आहे. त्यांचे सर्वच लिखाण अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. त्यांच्या लिखाणातील सर्व संदर्भ आणि तपशील फारच मोलाचे असतात. आज नैतीकता गुंडाळून राजकारण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसा असलेला माणूसच आज राजकारण करू शकतो. राज्यसंस्था प्रबळ होत असून लोकशाही दुर्बल होत आहे. राजकारणामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. राजकीय प्रतिनिधीत्वाचा पाया संकुचित होत आहे. इंदिरा गांधी यांनी देशांमध्ये आणीबाणी आणली होती परंतु त्यांनी कधीही घटनेचे मूलभूत स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला नाही, हे मान्य करावे लागेल. पंडित जवाहरलाल नेहरू सारखा पंतप्रधान पुन्हा या देशाला लाभेल की नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.
    सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूरकरांनी मला भरपूर दिले आहे. याचे मला कधीही विस्मरण होणार नाही. लोकशाहीचे आचरण करीत आणि चुका करणाऱ्यांना क्षमा करून मानवाने विकास केला पाहिजे. राजकीय तत्त्वज्ञान व राजकीय दृष्टिकोन यावर माझा पिंड जोपासलेला आहे. नव-मार्क्सवाद आज जगाला तारु शकेल असे मला वाटते. विचारशलाका त्रैमासिकामुळे मी नव-मार्क्सवाद आणि काही महत्त्वाचे लेख मी लिहू शकलो.
    अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांचे अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन करून असे प्रतिपादन केले की, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांचे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या विकासाबरोबर महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू सेंटरच्या विकासामध्येही मोठे योगदान आहे. त्यांचे शिक्षणामध्ये आणि सामाजिक व राजकीय चिंतनात मौलिक योगदान आहे. ते जसे लिहितात तसे वागतात. जे उपलब्ध नाही त्यावर त्यांनी लेखन व संशोधन केलेले आहे. संशोधन हा शिक्षणाचा आत्मा असतो याचे भान त्यांनी सतत ठेवले आहे.
    लेल्या या समारंभाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर शिवाजी पाटील यांनी केले. याप्रसंगी विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी लोकशाही विशेषांकाविषयी भूमिका विषद करताना असे प्रतिपादन केले की आज लोकशाहीचा संकोच होत आहे. लोकशाही तत्वे आणि मूल्यावर आघात होत आहेत. लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी विचारवंत, साहित्यिक आणि कलावंतांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. पुढे त्यांनी डॉक्टर चौसाळकर यांचे अभिष्टचिंतन करून असेही म्हणाले की प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांचे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चिंतन आणि समाजप्रबोधनामध्ये मोलाचे योगदान आहे.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. श्रद्धा कोठावळे यांनी केले तर प्रा. सुनील पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. विवेक घोटाळे, डॉ. भारती पाटील, प्रा. डॉ. प्रकाश पवार, दलित मित्र भोसले, प्राचार्य टी. टी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, डॉ. अरुण भोसले, डॉ. पाटील, प्रा. रणजीत शिंदे, गौरी चौसाळकर, डॉ. सूर्यकांत गायकवाड आदि मान्यवरांसह कोल्हापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विचारवंत, साहित्यिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
error: Content is protected !!