लातूर (दिलीप आदमाने ) – महाविद्यालयीन युवकांमधील कलागुणांना राष्ट्रीयस्तरावर वाव मिळावा म्हणून ३७ वा आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सव दि. २१ मार्च ते ०१ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये लुधियाना (पंजाब) येथे संपन्न झाला. या युवक महोत्सवात शोभायात्रा, मीमीक्री आणि लोकसंगीत या कलाप्रकारात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथून कलावंत विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. यामध्ये लोकसंगीत या कलाप्रकारामध्ये देश पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक नांदेड विद्यापीठास प्राप्त झाले. यामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील कैवल्य पांचाळ आणि गणेश शिंदे या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांनी विद्यापीठाच्या इतिहासामध्ये मानाचा तुरा रोवला आणि विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीयस्तरावरील युवक महोत्सवामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून दिले त्याबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर अप्पा मल्लिकार्जुन अप्पा बिडवे यांच्या हस्ते कैवल्य पांचाळ आणि गणेश शिंदे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक अँड.श्रीकांत अप्पा उटगे, प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. दिनेश मौने, डॉ. यशवंत वळवी, डॉ. दीपक चाटे, डॉ. जितेंद्र देशमुख, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. सरस्वती बोरगावकर आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर अप्पा बिडवे म्हणाले की, राष्ट्रीयस्तरावर मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल मला अत्यानंद झाला असून या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालय प्रमुख, सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि कलावंत यांचे फार मोठे योगदान आहे. आपल्या महाविद्यालयाचा राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक केल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून आपण सर्वांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर पुढील भविष्यामध्ये यश संपादन करावे अशी सदिच्छाही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ संचालक अँड. श्रीकांत उटगे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार नामदेव बेंदरगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष येचेवाड, नंदू काजापुरे, बालाजी डावकरे, जलील सय्यद, भीमाशंकर सुगरे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे