धाराशिव (जिमाका) – १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ४० -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.निवडणूक काळात पथके गठीत करण्यात आली आहे.आतापासूनच सर्व तपासणी नाक्यांवर पथकांनी सज्ज राहून वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले. दि. २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना डॉ.ओम्बासे बोलत होते.यावेळी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड, कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरूषोत्तम रुकमे,तहसिलदार प्रविण पांडे,नायब तहसिलदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक या बैठकीत सहभागी होते.
यावेळी डॉ.ओम्बासे म्हणाले,निवडणूक काळात अवैध मार्गाने दारूची व पैशाची वाहतूक होणार नाही याची सर्व पथकांनी दक्षता घेवून चोखपणे काम करावे.जिल्हयातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा महामार्ग, तसेच आंतरराज्य सीमेवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे.राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी तपासणी पथके वाढविण्यात यावी.सर्व पथकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दयाव्यात.सर्व पथकांनी आपली माहिती वेळोवेळी जिल्हा निवडणूक विभागास उपलब्ध करून दयावी.ज्या खाजगी भिंतीवर राजकीय पक्षांचे चिन्ह लावण्यात आले आहे,त्या घरमालकांचे संमतीपत्र त्यांच्याकडून भरून घ्यावे. निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम व्यापक प्रमाणात आयोजित करावे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकडे विशेष लक्ष दयावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.जे परवाना असलेली शस्त्रे आहेत ते तातडीने जमा करण्यात यावी.ज्यांनी अद्यापही शस्त्रे जमा केलेली नाही,अशांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात यावे.आंतरराज्य सीमेवर असलेल्या पथकांना वॉकीटॉकी,सीसीटीव्ही, बॅरीकेटस, पेंडॉल,लाईटस व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दयावी. प्रत्येक वाहनांची रजिस्टरमध्ये नोंद करण्यात यावी. सीमेवरील तपासणी पथकांना उपविभागीय अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदारांनी वेळोवेळी भेट दयावी असे ते यावेळी म्हणाले.
सभेत सी-व्हिजीलवर प्राप्त तक्रारींचा,वॉरंट, कलम 107 व 110 अंतर्गत दाखल प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे,त्यामध्ये घेतलेली बंधपत्रे,परवानाधारक शस्त्रे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई,दुरूस्त व नादुरूस्त वाहनाबाबतचा आढावा घेण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसलिदार व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन