तांदुळवाडी – गोरगरिब कष्टकर्यांचे,शेतकर्यांचे आणि सर्वच बहुजनांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरावर ठराविक लोकांची मक्तेदारी झाली होती. सामाजिक संघटनांनी दिलेल्या लढ्यातून मंदिराचा कारभार राज्य शासनाकडे गेला आहे. मात्र काही लोक मंदिराचा कारभार पुन्हा बडव्याच्या हातात देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करत आहेत. बडव्यांकडे मंदिराचा कारभार न जाता तो राज्य शासनाकडेच रहावा, अशा मागणीचा ठराव धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदूळवाडी ग्रामपंयाचतीने केला आहे. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा ग्रामस्थ सतिश काळे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. तसेच तांदूळवाडी गावचे सरपंच प्रणित डिकले, उपसरपंच महावीर डिकले यांनी यासाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावात नमूद केले आहे की, दत्तात्रय ज्ञानोबा कोल्हे मुंबई येथील उच्च न्यायालय यांचे न्यायालयात पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 संदर्भात कायदेची वैधता आव्हानित केलेली जनहित याचिका क्रमांक 4368 / 2023 अन्वये याचिका कर्त्याच्या मागणीस समस्त ग्रामस्थ, वारकरी विठल भक्त भारतीय नागरिक इत्यादी म्हणून विरोध व जोरदार हरकत आहे. पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 लागू झाल्यानंतर श्री विठ्ठल देवस्थान मंदिर परिसराचा विकास झालेला आहे. वारकरी भाविक भक्ताच्या सोयी सुविधा चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत. येथे येणार्या भाविकांची संख्या दररोज वाढत असून भाविक समाधानी आहेत. लाखो वारकरी भाविक यांच्या पंढपूर मंदिरे अधिनियम 1973 च्या बाबत असलेल्या भावनाचा आम्ही तांदूळवाडी ग्रामस्थ सन्मान आणि समर्थन करतो. या कायद्याच्या विरोधात दाखल याचिका फेटाळून लावली जावी, अशी उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे.विठ्ठल मंदिर, तीर्थक्षेत्र पंढरपूर विषयी पंढपूर मंदिर अधिनियम 1973 घटनात्मक, सामाजिक, अध्यात्मिक व कायदेशीर स्तरावर जनहित करिता योग्य व आवश्यक आहे. असे ठरावात सर्वानुमते ठरले असल्याचे नमूद करण्यात आले. दत्तात्रय भगवान गाडे यांनी अनुमोदन दिले. असा ठराव करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर मंदिरातील बडव्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी सामाजिक लढे उभारलेले आहेत. त्याला यश देखील आले आहे. मात्र आता पुन्हा काही लोक बडव्यांच्या हातात बहुजनाचे दैवत पांडुरंगाचा कारभार देत आहेत. त्याला तीव्र विरोध करू. तसेच राज्यातील सर्वच बहुजनांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून बडव्यांच्या हातात कारभार नको, यासाठी लढा उभारावा असे आवाहन काळे यांनी केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले