April 3, 2026

श्री संतयोगी साधुबुवा महाराज पालखी सोहळ्याची घोषणा; पिंपळगाव (डो) ते तेर पायी दिंडी,हजारो वारकऱ्यांचा सहभाग अपेक्षित

  • कळंब – तालुक्यातील पिंपळगाव (डो) येथे श्री संतयोगी साधुबुवा महाराज संजीवन समाधी देवस्थान वारकरी संप्रदाय फडाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    या सोहळ्यांतर्गत पिंपळगाव (डो) ते श्रीक्षेत्र तेर असा पारंपरिक पायी दिंडी सोहळा पार पडणार आहे.यंदा या सोहळ्याचे २२ वे वर्ष असून वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय परंपरेचे दर्शन घडणार आहे. “वैराग्याचा मेरू, तो हा गोरा कुंभार” या अभंगातून संत परंपरेचा संदेश देत संत गोरोबा काका समाधी सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
    दिंडीमध्ये आडसुळवाडी,
    करंजकल्ला,जवळा,मंगरुळ, कळंब,हिंगणगाव,खरबवाडी, आरणगाव,सावळेश्वर आदी गावांतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.कीर्तन, भजन,भारूड,हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय होणार आहे. मृदंगाचार्य,गायनाचार्य तसेच विविध भजनी मंडळांच्या सहभागामुळे सोहळ्याची शोभा अधिक वाढणार आहे.
    दि.१२ ते १४ एप्रिल दरम्यान विविध ठिकाणी अन्नदान,
    चहा-नाश्ता व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. गोवर्धनवाडी,माळकरंजा, लोमटे बस्ती,हनुमान मंदिर परिसर आदी ठिकाणी वारकऱ्यांसाठी विशेष सोयी करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल रोजी द्वादशी कीर्तन व महाप्रसादानंतर दिंडीची सांगता होणार आहे.
    या सोहळ्यासाठी ह.भ.प. बाळासाहेब पवार,पद्मराज (बापू) काकडे,तुकाराम यंचलवाड,
    हरिदास पवार,बबन जगदाळे आदी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.तसेच विश्वंभरबुवा महाराज,रामहारी डंबरे महाराज, श्रीनिवास महाराज यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
    संपूर्ण सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी संयोजक मंडळ, ग्रामस्थ व वारकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली असून भाविकांनी शिस्तीचे पालन करून या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संतयोगी साधुबुवा महाराज संजीवन समाधी देवस्थान वारकरी संप्रदाय फडाचे अध्यक्ष नारायण दशवंत यांनी केले आहे.
error: Content is protected !!