कळंब (राजाभाऊ बारगुले) – महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात दि.१५ फेब्रुवारी २०२६ वार रविवार ह.भ.प. बाळासाहेब बोधले महाराज यांचे अमृततुल्य कीर्तन भक्तिभावात संपन्न झाले.यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना बोधले महाराजांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. भारतभूमी ही संतांची,ऋषी-मुनींची आणि त्यागी महापुरुषांची पावन भूमी आहे.भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्था,संस्कार,करुणा, सहिष्णुता आणि कर्तव्यनिष्ठा यांसारखी अनमोल मूल्ये आहेत.हीच आपली खरी ओळख आहे,असे बोधले महाराज म्हणाले. ते पुढे म्हणाले,आजच्या धकाधकीच्या आणि आधुनिकतेच्या काळात तरुण पिढीने आपल्या संस्कृतीचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या देशाचा,धर्माचा आणि परंपरेचा अभिमान बाळगणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.राष्ट्रप्रेम आणि संस्कार जपले तरच समाज सुदृढ राहील. कीर्तनादरम्यान संतवाङ्मयातील अभंग,ओव्या आणि उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले.संतांनी दिलेला नामस्मरणाचा मार्ग हा जीवनातील दुःख दूर करणारा आणि मनाला शांतता देणारा आहे.हरिनामातच खरे समाधान आहे,असेही त्यांनी नमूद केले.
महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने भागवतराव धस यांच्या वतीने भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताह सोहळ्यास कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,कळंब नगर परिषदेचे नगरसेवक अमर चाऊस,तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे,ज्येष्ठ पत्रकार सुभाष घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मंदिर संस्थानच्या वतीने मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नारायण दशवंत,भागवत धस,बाळासाहेब धस,महेश धस यांनी सन्मान सोहळा पार पाडला. सप्ताहाची सांगता हरिनामाच्या गजरात आणि भक्तिभावात झाली असून,कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
More Stories
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव डोळा येथील मंदिरास भेट
पिंपळगाव डोळा येथे अंबाबाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात