आष्टा – भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये संस्थापक अध्यक्ष,आदरणीय शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात संत नामदेवांच्या “ज्ञान दीप लावू जगी” या उक्तीला प्रमाण मानून तसेच बुद्ध,शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांच्या समतावादी विचारांची कास धरत निजामकालीन कठीण परिस्थितीतही शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी १९५१ साली कळंब तालुक्यातील मोहा येथे शिक्षणाचे रोपटे लावले.ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी,मजूर,दिनदलित व बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. यानंतर ज्ञान प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यात विविध ठिकाणी प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये,वरिष्ठ महाविद्यालये तसेच वसतिगृहे स्थापन करून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा रुजवली. समाजहितासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान शिक्षणतज्ज्ञांच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी कृतज्ञतेने केली. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ मार्च २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात शिक्षणप्रेमी पालक अशोक शिवाजीराव गिलबिले यांच्या हस्ते शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी गुरुजींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणसेवा अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन
विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श अंगीकारावा – रविंद्र वाघमारे