मुंबई – स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या शौर्य,त्याग आणि स्वाभिमानाची आठवण देशभर काढली जाते; मात्र त्याच संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची खंत व्यक्त करत हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली. अधिवेशनात बोलताना आमदार पाटील म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आम्ही आहोत,”असे जाहीरपणे सांगितले आहे.मात्र प्रत्यक्षात संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी देताना राज्य सरकारचा हात आखडता का घेतला जात आहे,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडू तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या स्मारकाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता.पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २८२ कोटी रुपये,तर दुसऱ्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात निधी मंजूर करताना सरकारकडून अपेक्षित आर्थिक तरतूद केली जात नसल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. सन २०२४–२५ च्या अर्थसंकल्पात केवळ ३० कोटी रुपये, तर २०२५–२६ मध्ये ४६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात ७५ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली होती, तर २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संभाजी महाराजांच्या स्मारकासारख्या ऐतिहासिक आणि अस्मितेच्या विषयावर इतकी तुटपुंजी तरतूद करणे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान,स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव असून त्यास नियोजन विभागाच्या शिखर समितीची अद्याप मंजुरी मिळालेली नाही.ही मान्यता तातडीने देऊन कामाला गती देणे अत्यावश्यक असल्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाप्रमाणे हे स्मारकही वर्षानुवर्षे रखडू नये. वडू तुळापूर येथील संभाजी महाराजांचे स्मारक तातडीने पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून देत निर्णय घ्यावा,अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
More Stories
“राज्याची आर्थिक गाडी अंतिम रेषेवर;कर्ज १२.८३ लाख कोटींच्या घरात” – आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्ला
धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक