पुणे – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळच्या अध्यक्षपदी नागपूर येथील डॉ.हरीश धुरट यांची एकमताने निवड करण्यात आली.दिवंगत कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते.महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली. पुणे येथील हमाल भवनमध्ये झालेल्या कार्यकारिणी बैठकीत डॉ. धुरट यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष राजकुमार घायाळ (बीड), साथी विकास मगदूम (सांगली), चिटणीस अरविंद घुले (अहिल्यानगर), हनुमंत बहिरट (पुणे), शिवाजी शिंदे (पंढरपूर), अप्पा खताळ (धुळे), साथी रमझान भाई पठाण (चंद्रपूर), खजिनदार साथी हुसेन पठाण (पुणे), संघटक गोरख मेंगडे, संतोष नांगरे, संजय साष्टे (पुणे), गंगाभाऊ कोळेकर (धुळे), कृष्णात चौगुले (कोल्हापूर), सूर्यकांत स्वामी (नांदेड) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*माथाडी कामगारांनी संघर्षासाठी सज्ज राहावे – डॉ. धुरट*
निवडीनंतर बोलताना डॉ.हरीश धुरट यांनी माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील माथाडी कामगारांनी एकजूट ठेवून संघर्षासाठी सिद्ध राहावे,असे आवाहन केले. राज्यातील काही जिल्हा माथाडी मंडळे मालक वर्गाच्या प्रभावाखाली काम करत असून कामगारांना न्याय मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. धुळे येथील खाजगी बाजार समितीतील माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही संबंधित मंडळे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांना शासन आदेश असूनही महागाई निर्देशांकानुसार रक्कम मिळत नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रश्नांवर ठोस लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
More Stories
बाबांच्या जाण्याने देशातील वंचित–कष्टकरी पोरके झाले : मान्यवरांची भावना
महाराष्ट्राची “संपदा” हरवली
वंचित बहुजन आघाडीचा आरएसएसविरोधात ‘जन आक्रोश मोर्चा’;उसळला जनसागर