छत्रपती संभाजीनगर – राष्ट्र सेवादल व लोकशाही समाजवादाच्या मुशीतून घडलेले, आयुष्यभर वंचित-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांच्या निधनाने देशातील तमाम वंचित घटक व अंगमेहनती कष्टकरी पोरके झाल्याची भावना विविध पक्ष, संघटना व सामाजिक चळवळीतील मान्यवरांनी व्यक्त केली.
मराठवाडा लेबर युनियन,महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ तसेच विविध डावे,लोकशाही, आंबेडकरवादी व गांधीवादी संघटनांच्या वतीने सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित आदरांजली सभेत बाबांच्या संघर्षमय जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. अध्यक्षीय मंडळातील साथी कचराबाई कांबळे,साथी अली खान,साथी आशाबाई डोके,साथी उत्तम नरवडे व साथी सर्जेराव जाधव यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सभेस प्रारंभ झाला.प्रारंभी बाबांचे आवडते कष्टकऱ्यांचे गीत आभाळाची आम्ही लेकरे व महात्मा फुले यांचा अखंड सत्य सर्वांचे आदी घर यांचे सामुदायिक गायन करण्यात आले. मान्यवर वक्त्यांनी बाबांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून १९५५ साली हमाल पंचायतची स्थापना करून कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचा आढावा घेतला.आणीबाणीच्या काळातील त्यांची ठाम भूमिका, अस्पृश्यतेविरुद्धची एक गाव–एक पाणवठा मोहीम,विस्थापित शेतकऱ्यांचे पुनर्वसन,माथाडी कायद्याचा विस्तार,देवदासी प्रथेचा विरोध,असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा,तसेच सत्यशोधक नियतकालिकाचे सलग ५२ वर्षांचे प्रकाशन या कार्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. महात्मा फुले,महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय साधत अहिंसक मार्गाने संघर्ष करण्याचा संदेश बाबांनी कायम दिल्याचे वक्त्यांनी सांगितले. या सभेत महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे,ॲड.डी.आर.शेळके, ॲड.विष्णू ढोबळे,रंजन दाणी,प्रा. राम बाहेती,ॲड.अभय टाकसाळ, कॉ.भगवान भोजने,कॉ.भीमराव बनसोड,ज्ञानप्रकाश मोदानी,प्रा. श्रीराम जाधव,मंगल खिंवसरा,प्रा. सुभाष महेर,प्रा.मच्छिंद्र गोरडे, मेराज सिद्दिकी,माजी आमदार विजय गव्हाणे आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस ॲड.सुभाष सावंगीकर यांनी केले.शेवटी संविधानाचे सामुदायिक वाचन करून सभेचा समारोप करण्यात आला.
More Stories
महाराष्ट्राची “संपदा” हरवली
वंचित बहुजन आघाडीचा आरएसएसविरोधात ‘जन आक्रोश मोर्चा’;उसळला जनसागर
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त पापळकर यांचे आवाहन