March 25, 2026

महाराष्ट्राची “संपदा” हरवली

  • डाॅ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूने राज्य हादरले आहे. राज्य शोकसागरात बुडाले आहे. प्रत्येक संवेदनशील माणूस निशब्द झाला आहे. कुठे आहे राज्यातील सरकार? कुठे आहे राज्याचा गृहमंत्री? कोण वाचवेल राज्यातील आमच्या लेकीबाळींना? अखेर राज्याने आणखी कुठवर निष्पाप मुली महिलांवरील अन्याय अत्याचार सहन करायचा? आणि कशासाठी? राज्यातील सर्व मुलींच्या आई वडिलांचा जीव डाॅ. संपदाच्या या घटनेने टांगणीला लागला आहे. त्यांच्या मनाला हुरहुर लागली आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेचा गवगवा सुरू असताना, बेटी पढाओ बेटी बचाओचा ढोल पिटत असताना, अशा घटना घडतातच कशा? लोकांची हिम्मत होतेच कशी? काय सरकार अशा गुन्हेगारांना अभय देतेय म्हणून अशा घटनात वाढ होतेय का? काय राज्यात कायद्याचा धाक उरला नाही म्हणून असे घडतेय का ? काय राज्यात कायद्याचे राज्य शिल्लक उरले नाही म्हणून अशा घटना घडतात काय? की जाणीवपूर्वक अशा घटना घडवून आणून राज्यात अराजक माजविण्याच्या कटाची ही एक कडी आहे? याचा जाब जनतेने गृहमंत्रालयाला विचारला पाहीजे. अशा घटना घडणे म्हणजे राज्यावर नामुष्की ओढवून घेणे आहे. कुंपणच शेत खाऊ लागले आहे. राज्यात काट्याने काटा काढला जाऊ लागला आहे. आणि कशासाठी? तर पक्ष हितासाठी, पक्ष वाचवण्यासाठी, पक्ष वाढीसाठी, आणि येनकेनप्रकारेण सत्ता टिकविण्यासाठी ! पक्षातून आमदार, खासदारांची संख्या कमी होऊ नये म्हणून त्यांनी कितीही महाभयंकर कृष्णकृत्य केले, तरीही त्यांची पाठराखण करायचीच, हा अतिशय अमानुष पायंडा जाणीवपूर्वक पाडण्यात आला आहे. यासाठी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या पाळीव सराईत गुंडांकडून क्रूरकृत्ये घडवून आणणे, ही तर राज्याची अघोरी वर्तणूक झाली. कधी नव्हे त्या एवढ्या भयंकर घटना राज्यात रोज घडत आहेत. आणि ज्यांनी अशा घटनांना रोख लावायचा, तातडीने काही उपाययोजना करायच्या ते गृहमंत्रीच स्वतः आरोपींना पाठबळ देत गावोगाव हिंडत आहेत. ही बाब राज्यातील नागरिकांच्या मनात चिड उत्पन्न करणारी आहे. सरकारची ही वृत्ती भयंकर संतापजनक आहे. आजच्या राजकारण्यांच्या स्वाभिमान शून्यतेने, बेअक्कलेने, वायफळ बडबडीने, अनैतिकतेने आणि अतिशय खालच्या पातळीवरच्या विचार, स्वभाव, कृतीने राज्य बदनाम होत आहे. जनतेचे शैक्षणिक, नोकरी, आरोग्य विषयक असे कोणतेच संविधानिक कल्याण करायचे नाही, असे कंगन यांनी हातात घातले आहे. अशा या खूनशी वज्रनिर्धाराने राज्यातील शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरांची विवेकवादी, पुरोगामी आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना यांनी र्‍हसातळाला नेली आहे. राज्य अक्षरश: यांच्या गलिच्छ राजकारणाच्या गटारात वाहत आहे. राजकारण्यांकडून आम्ही या गटारातील किडे आहोत, असे स्वतःला सिद्ध करण्याची चढाओढ लागली आहे. कधी नव्हे ते एवढे घृणास्पद आणि अत्यंत खालच्या पातळीवरच्या यांच्या स्वभाव, वर्तणूकीला राजकारण संबोधण्यात येऊ लागले आहे. त्यासाठी राज्याची संपदा धुळीस मिसळली जात आहे. राजकारण्यांचे राजकीय संस्कार आणि त्यांची मातृसंस्कृती हीच का? असे प्रश्न जनतेला पडले आहेत. एवढ्या गंभीर घटनांना हलकेच घेऊन केवळ त्यांच्या राजकारण्यांना वाचवणे, एवढेच ध्येय ठेवून सदर क्रूर संघटीत सरकारी
    घटनेकडे कानाडोळा करणे, ही बाब राज्याची मान शरमेने खाली झूकवणारी आहे. अशा वर्तणूकीची राजकारण्यांना थोडी ही लाज वाटत नाही. राज्यातील माता, भगिनींवरचे वाढते क्रूर हल्ले, पाशवी बलात्कार, हत्या, अन्याय, अपहरण, अचानक गायब होण्याने आणि अत्याचाराने तर टोक गाठले आहे. यात कहर म्हणजे राजकारण्यांच्या सांगण्यावरून पोलीस खाते आणि आरोग्य खाते तर पाहीजे तेवढ्या उठबशा अर्ध्यारात्री स्वतःचे कानधरून घालायला तयार आहेत. याची लाज राज्याच्या गृहमंत्रालयाला, पोलीस महासंचालकाला आणि आरोग्यमंत्र्याला ही वाटली पाहीजे. दिवसेंदिवस पोलिसांचा माज वाढत चालला आहे. संघटीत सरकारी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. कारण सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. ही सरकारी गुंडगीरी निष्पाप जनतेच्या मुळावर उठली आहे. माता भगिनींवरील रोजच्या वाढत्या घटनांमुळे राज्याला चिंतेने ग्रासले आहे. राज्य भयभीत बनले आहे. मुलीच्या आई वडीलाची झोप उडाली आहे. जनता एका अन्यायी, अत्याचारी घटनेच्या धक्क्याने सावरत नाही, तोच दुसरी घटना घडत आहे. प्रत्येक संवेदनशील माणूस संपदा सारख्यांच्या मृत्यूने काळजीत पडला आहे. तो सुन्न झाला आहे. तो खिन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुठे आहेत राज्यातील वैद्यकीय संघटना? कुठे आहेत देशपातळीवरील वैद्यकीय संघटना? कुठे आहेत राज्यातील वैद्यकीय आधिकारी संस्था? कुठे आहेत राज्यातील डाॅक्टर भगिनी – बांधव? कुठे आहे त्यांची एकजूट? यांच्या तोंडून निषेधाचे शब्द का निघत नाहीत? यांच्याकडून सरकारला जाब विचारणारी कृती का होत नाही? यांना कोणाची भीती वाटतेय डाॅक्टर एवढे मूग गिळून गप्प का बसले आहेत? संविधान आहे तोपर्यंत राज्यात सर्वांनाच बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणून बोला, लिहा, चर्चा करा, व्यक्त व्हा. अन्यायाविरुद्ध पेटून उठा. त्यासाठी जात, धर्म, गाव, तालूका, जिल्हा, प्रदेश, नोकरी, पद, गरीब, श्रीमंत काही बघू नका. सरकार, मंत्री, आमदार, खासदारांना घाबरू नका. जर आता बोलणार नाहीत, निषेध करणार नाहीत तर मग काय येऊ घातलेल्या मनुस्मृतीच्या काळात व्यक्त होणार आहात? तेंव्हा तुम्हाला तोंड तरी उघडता येईल काय? तेंव्हा तर तुमची ब्र शब्दही काढायची हिम्मत होणार नाही. म्हणून आज आपली बोलती बंद ठेऊ नका. अन्यायाला वाचा फोडत रहा. शक्य तेवढा निषेध नोंदवत रहा. त्यासाठी कृती करीत रहा. जिवंत असल्याचा, विवेकी असल्याचा पुरावा देत रहा. “माणूस सर्वोच्च आहे, सरकार नाही.” मानवाच्या जिवीताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्याची संपदा पुन्हा हरवता कामा नये म्हणून राज्याच्या गृहमंत्र्याने सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यातून चालते झाले पाहीजे.

    ॲड. सुभाष सावंगीकर
    छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
    मो. 9325209492
error: Content is protected !!