March 3, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी
    धाराशिव (जिमाका)– जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने लेडीज क्लब,धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेश ब्रम्हे,न्यायमूर्ती,मुंबई उच्च न्यायालय यांच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील,जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव होत्या.
    महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग,(वार रूम – मध्यवर्ती नियंत्रण कक्ष),जिल्हा वाहतूक शाखा पोलीस विभाग,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,उपविभागीय अधिकारी कार्यालय,जिल्हा कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,आरोग्य विभागाचा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम,मोबाईल मेडिकल हॉस्पिटल,आयुष्मान भारत, अ‍ॅनिमियामुक्त भारत अभियान,रेशीम विकास विभाग,महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा उद्योग केंद्र,महिला व बाल विकास विभाग,महिला बालकल्याण विभाग,पशुसंवर्धन विभाग, मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान, शिक्षण विभाग,येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र (येरमाळा),अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नोंदणी व मुद्रांक विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,जिल्हा रुग्णालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रक्तदान शिबिर,तहसील कार्यालय,धाराशिव,जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम,व्हाइट गोल्ड चॉकी सेंटर,खामकरवाडी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना/विकसित भारत जी राम जी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचा स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – २,वीज वितरण कंपनीची सौर ऊर्जा योजना यांसह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते.
    या सर्व स्टॉलना नागरिक,महिला व लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.अनेक पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्टॉलवर विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.
    विधी सेवा महाशिबिराचा उद्देश सर्वसामान्यांना मोफत व त्वरित कायदेविषयक मदत उपलब्ध करून देणे,नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे,पात्रांना मोफत विधी साहाय्य देणे तसेच प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमार्फत निकाली काढण्यास प्रोत्साहन देणे हा होता.
    त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत वंचित, गरजू,महिला,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व इतर दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवून “सर्वांसाठी न्याय” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या उपक्रमामागील मूलभूत हेतू होता.
error: Content is protected !!