लातूर – पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ४१ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि त्यासाठी एकाच कुटुंबातील अनेक जण पीएचडी करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा भीम आर्मी भारत एकता मिशनकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे.भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे म्हणाले की,शिष्यवृत्ती ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे,यासाठी दिली जाते.जर एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती पीएचडी करत असतील,तर शासनाने त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मागासवर्गीय कुटुंबातील तरुण-तरुणी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची,कुटुंबाची आणि समाजाची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,अशा वक्तव्यांतून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षणच घेऊ नये,असा संदेश दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या मूलमंत्राचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले की,मागासवर्गीय विद्यार्थी हे शिक्षण प्राशन करत असून,भविष्यात अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठवतील,हीच काहींना भीती वाटत असल्याने असे विषय छेडले जात असावेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती राजकारणात असून, राजकारणातून पैसा कमावणे योग्य आणि मागासवर्गीयांनी शिक्षणातून प्रगती करणे अयोग्य, हा दुहेरी निकष का,असा सवालही विनोद कोल्हे यांनी उपस्थित केला. या वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत असून,शासनाने अशा विधानांचा फेरविचार करावा,अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनकडून करण्यात आली आहे.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो