लातूर – जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना, जळकोट तालुक्यातील डोमगाव येथील बौद्ध समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज आपल्या लहानग्या मुलाबाळांसह मुसळधार पावसात बेमुदत धरणे आंदोलन करत आहे. जळकोट तालुक्यातील डोमगाव येथील भानुदास वाघमारे यांच्या गाडीवर अशोक चक्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेले स्टिकर असल्यामुळे गावातील मनुवादी विचारधारेच्या व्यक्तींनी जातीवादातून वाघमारे यांच्यावर हल्ला केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. पाणीपुरवठा बंद, दळण बंदी,किराणा व प्रवासाची बंदी यामुळे या गावातील केवळ पाच-सहा बौद्ध कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतकेच नाही, तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. या संदर्भात जळकोट पोलीस ठाण्यात 12 तारखेला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, अद्यापही आरोपींविरोधात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या अन्यायाविरोधात पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत धरणे आंदोलन करत असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आंदोलनात भीम आर्मी भारत एकता मिशनने जाहीर पाठिंबा देऊन उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आरोपींविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबांचे जळकोट शहरात पुनर्वसन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, लातूर शहराध्यक्ष संदीप कांबळे, उदगीर शहराध्यक्ष राहुल कांबळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विनोद भाऊ कोल्हे यांनी इशारा दिला की, “जर प्रशासनाने आरोपींविरोधात तातडीने कारवाई करून पीडित कुटुंबांचे पुनर्वसन केले नाही, तर भीम आर्मीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.” सध्या लातूर जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती असूनही बौद्ध समाजास पावसात बेमुदत आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या पीडित कुटुंबाच्या मागण्या तातडीने मान्य करणे अत्यावश्यक आहे.
More Stories
समाजसेवेचा गौरव;सुधाकर रणदिवे यांना लातुरात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव