डॉ.अण्णा भाऊ साठे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो श्रमिकांचा एक बुलंद आवाज, लोककलेची धगधगती मशाल आणि सामाजिक परिवर्तनासाठी झटणारा एक लढवय्या साहित्यिक.१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव या छोट्याशा गावात जन्मलेले अण्णा भाऊ साठे म्हणजे गरीब,वंचित, शोषित समाजाच्या भावना बोलक्या करणारा साहित्यिक होता. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अनुभव हेच त्यांच्या लेखनाचे बीज होते. गरिबी,जातिभेद,अन्याय आणि असमानता या विरुद्ध त्यांनी साहित्य हेच शस्त्र बनवले. “फकिरा” हा त्यांचा कादंबरीप्रकारातला अतिशय प्रसिद्ध ग्रंथ,आजही समाजाला जागं करण्याचं काम करतो. फकिरा हे केवळ एक पात्र नव्हे, तर ते एक चळवळीचे प्रतीक आहे – अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि स्वतःचं अस्तित्व जपणारा एक बंडखोर.डॉ.अण्णा भाऊ साठेंचे लेखन हे केवळ कल्पनेवर आधारित नव्हते – ते वास्तवाच्या मातीने तयार झालेले होते. त्यांनी समाजातील तळागाळातल्या लोकांचे दुःख,वेदना,संघर्ष,आणि स्वप्नं मांडली.
वाटेगाव ते मुंबई हा ३२० किलोमीटरचा प्रवास पायी चालून पूर्ण केल्यानंतर लहान वयात मुंबईला पोचल्यावर मिलमध्ये मजूर, कोळशाच्या खाणीत काम, चित्रपटांचे पोस्टर लावणे, घरगडी, कुत्रा सांभाळणे अशी असंख्य कामे करत असताना तत्कालीन काळात कामगारांच्या जीवनातील व्यथा वेदना अण्णाभाऊंना स्वस्थ बसू देत नाही. ते केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी दलित चळवळीत, श्रमिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. रशियाच्या दौऱ्यावर गेलेल्या काही मोजक्या भारतीयांमध्ये त्यांचा समावेश होता, हे त्यांच्या प्रभावी प्रतिभेचं आणि जागतिक पातळीवरच्या ओळखीचं प्रमाण आहे.
अण्णा भाऊंनी लोककथानाट्य, तमाशा,आणि लोकगीते यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केलं. अण्णाभाऊंचं साहित्य हे विश्वात नोंद घेणारं ठरलं. ३५ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह,१४ लोकनाट्य,११ पोवाडे,एक प्रवासवर्णन,एक नाटक अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. त्यांनी लेखनाला केवळ बौद्धिक चौकटीत मर्यादित न ठेवता, ते लोकांच्या मनाशी जोडले. हे सर्व साहित्य त्यांनी केवळ पुस्तकी न ठेवता, ते लोकांपर्यंत पोहोचवलं – चौकात, झोपडपट्ट्यांमध्ये, कारखान्यांमध्ये. त्यामुळेच त्यांना लोकसाहित्यिक म्हणतात. डॉ.अण्णाभाऊंच्या साहित्य लेखनावर अनेक चित्रपट आले. त्यावर दिग्दर्शकांनी करोडो रुपये कमवले.पण अण्णाना शेवटच्या काळात चिराग नगरच्या झोपडीत जीवन घालवावे लागले. त्याकाळी तत्कालीन पंतप्रधान यांना सांगण्यात आले की कोणी प्रचंड ताकतीचा साहित्यिक आपल्या देशात आहे तो मुंबईत राहतो. त्यांना भेटायला त्यांचे शिष्टमंडळ आणि अधिकारी झोपडीत आले असता, ‘तुम्ही जागतिक कीर्तीचे साहित्यिक पण अण्णा,तुमच्या घराचा उंबरठा एवढा खुजा आहे.’ आणि अण्णा म्हणतात, ‘साहेब, झोपडीत माझ्या वाकूनच यावे लागते. म्हणजे साहित्यामधील करारी आणि स्वाभिमानी बाणा प्रत्येकाच्या मनात येईल, अशी माफक अपेक्षा ठेवतो.’ डॉ.अण्णा भाऊंच्या साहित्याचा आपल्या देशात वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झालेला आहे.त्याशिवाय भारतीय भाषा सोडून २७ परप्रांतीय भाषांत अनुवाद झाला आहे. म्हणूनच “जगात देखणी अण्णाभाऊंची लेखणी” हे विधानाच्या खरेपणावर शंका येत नाही. खरं तर दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी लेखणीलाच आपले हत्यार बनवले.साहित्यातूनच त्यांनी समाजपरिवर्तनाचे प्रचंड शस्त्र निर्माण केले. अण्णा भाऊंनी स्वतः अनुभवलेले जग,समाजाच्या व्यथा आपल्या साहित्याच्या माध्यमातून चित्रित केल्या. दीन दलितांच्या जीवनाची व्यथा मांडून जगण्यासाठी चाललेली झुंज हेच आपल्या साहित्याचे मूलतत्त्व बनवले. आज अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी करताना आपण फक्त त्यांच्या स्मृती जागवायच्या नसून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा मार्ग अनुसरण्याचा संकल्प करायचा आहे.वंचितांसाठी, न्यायासाठी आणि समानतेसाठी लढणाऱ्या अण्णा भाऊंचं जीवन हे आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे. सामाजिक विषमता,जातीभेद, गरिबी,अन्याय आणि शोषण यांचा सामना करत त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरु केला,आणि तेच आयुष्य त्यांनी आपल्या लेखणीत उतरवलं. डॉ.अण्णा भाऊंनी केवळ लेखनच केलं नाही,तर ते तमाशा,पोवाडा, लोककथा,लोकनाट्य यांसारख्या माध्यमांतून समाजप्रबोधन करत राहिले.त्यांच्या पोवाड्यांमध्ये क्रांतीचा हुंकार आहे,त्यांच्या कथांमध्ये शोषणाविरुद्धचा रोष आहे, आणि त्यांच्या गाण्यांमध्ये माणूसकीचा सूर आहे. डॉ.अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर ते श्रमिकांचे नेते, दलितांचे प्रवक्ते,आणि समतेचे सैनिक होते.त्यांनी श्रमिक चळवळींमध्ये भाग घेतला,गिरणी कामगारांसोबत रस्त्यावर उतरले, आणि संपूर्ण आयुष्य समता आणि न्याय या ध्येयासाठी समर्पित केलं. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा होता की,रशियातही त्याची दखल घेतली गेली.तेथे त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले,आणि एका भारतीय दलित लेखकाला जागतिक पातळीवरचा सन्मान मिळाला. आज डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करताना, आपल्याला त्यांच्या विचारांशी नातं जपावं लागेल.फक्त घोषणांमध्ये नाही, तर कृतीतून त्यांच्या स्वप्नांचा वारसा पुढे न्यावा लागेल.जात, वर्ग,भाषा यापलीकडे जाऊन माणूसपणाला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. डॉ.अण्णा भाऊ साठे यांचं आयुष्य हे संघर्षाचं प्रतीक आहे आणि त्यांचं साहित्य हे परिवर्तनाचं अस्त्र. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालणं म्हणजेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
डॉ.अण्णा भाऊ साठेंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
— प्रा.सोमनाथ रामहरी कसबे छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब संपर्क – ८६२३८९२८८१
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले