धाराशिव (जिमाका) – आगामी सण-उत्सव,जयंती मिरवणुका,तसेच विविध संघटनांकडून अपेक्षित आंदोलने लक्षात घेता,जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाने जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केला आहे.हा आदेश २९ जुलै रोजीच्या पहाटे १ वाजतापासून ११ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू राहणार आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी परवानगी शिवाय एकत्र येणे,मोर्चा,मिरवणूक किंवा सभा घेणे यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच,शस्त्र,लाठीकाठ्या, स्फोटके,दाहक पदार्थ,विडंबनात्मक चित्रे किंवा प्रक्षोभक घोषणा घेऊन फिरणे यासही मनाई करण्यात आली आहे.याशिवाय,आक्षेपार्ह भाषणे, अंगविक्षेपण,असभ्य वर्तन, देशविरोधी किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार,श्रावण महिना, अणाभाऊ साठे जयंती,तसेच मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मागण्यांवरून आंदोलने,पिकविमा भरपाईसंदर्भात शेतकऱ्यांचे उपोषण, धरणे,रास्तारोको होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील शांतता टिकविण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. हा आदेश धार्मिक विधी,अंत्ययात्रा, लग्नसोहळे,शासकीय कार्यक्रम व सिनेमागृहे अशा सामान्य कार्यक्रमांना लागू होणार नाही.मात्र,कोणत्याही मोर्चा,सभा किंवा राजकीय प्रचार कार्यक्रमासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी २८ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे जारी केला असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला