August 8, 2025

सय्यद शमशोद्दीन भारत गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित

  • लातूर – पुण्यात ‘रंग श्रावणाचा – भारत गौरव सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात पार पडला. हिरकणी महिला विकास संस्था अध्यक्षा सौ. शर्मिला नलावडे व ‘विसावा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
    या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये लातूर जिल्ह्याचे सुपुत्र सुफी सय्यद शमशोद्दीन यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.गेल्या तीन दशकांपासून सातत्याने सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या शमशोद्दीन यांना ‘भारत गौरव सन्मान’ देऊन गौरवण्यात आले.
    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेजस बर्वे (संत ज्ञानेश्वरांचे ‘मुक्ताई’ चित्रपटातील प्रमुख भूमिका), प्रकाश दिंडले (अभिनेते व दिग्दर्शक),दिलीप घेवंदे (स्टार प्रवाहवरील ‘गोष्ट प्रेमाची’ मालिकेतील अभिनेता) तसेच इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व पुरस्कारार्थींना मानचिन्ह, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
    सुफी सय्यद शमशोद्दीन यांचा कार्यप्रवास :
    गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ लातूर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असलेल्या शमशोद्दीन यांनी विद्यार्थी संघटना (SFI, DYFI), शेतकरी संघटना, पोलीस मित्र उपक्रम (२००७ पासून) तसेच दलित चळवळीतील युवा भीम सेनेचे संस्थापक प्रवक्ते म्हणून कार्य केले आहे.सामाजिक समतेसाठी,युवकांच्या सक्षमीकरणासाठी आणि शैक्षणिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे.
    त्यांच्या या सन्मानाबद्दल लातूर जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
error: Content is protected !!