August 8, 2025

रुग्णांच्या गैरसोयीस जबाबदार डॉक्टर्सवर कार्यवाहीचे आश्वासनानंतर संजीत मस्के यांचे आमरण उपोषण मागे

  • कळंब – कळंब उपजिल्हा रुग्णालय येथे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून याला जबाबदार डॉक्टर व डॉक्टरच्या कमिशन साठी गोरगरीब रुग्णांची लुटमार करणारे खाजगी औषध विक्रेते यांच्या विरोधात कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते संजीत मस्के यांनी शुक्रवार दिनांक ११ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले व या उपोषणाच्या दुसऱ्या दिवश १२ जुलै रोजी डॉ.एन.एस. धर्माधिकारी वैद्यकीय अधीक्षक वर्ग- १ यांनी उपोषण कर्ते संजीत मस्के यांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्या मागण्याविषयी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संजीत मस्के यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
    याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.एस.धर्माधिकारी यांनी आपल्या मागण्याची पूर्तता करण्यात येईल,ड्युटीच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी दवाखान्याच्या कॅम्पस बाहेर जाणार नाहीत तसेच अर्जातील मागणीनुसार डॉ. सी.बी.लामतुरे यांना रजेवर पाठविण्यात येत असून याविषयी योग्य चौकशी करून निर्णय घेण्यात येईल व मागण्या विषयी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
    संजीत मस्के यांचे गेली दोन दिवस आपल्या मागण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंब समोर आमरण उपोषण आरंभिले होते कळंब शहरातील विविध पक्ष संघटना कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन उपोषणास आपला पाठिंबा व्यक्त केला.यामध्ये माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा संघटक अतुल गायकवाड,शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मेटे, लोक जनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष राजभाऊ गायकवाड,कळंब तालुका अध्यक्ष सचिन काळे,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ तसेच काँग्रेस आय पक्षाचे सचिन गायकवाड,अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कांबळे यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
    उपोषणकर्ते संजीत मस्के यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सी.बी.लामतुरे हे सेवेत कसूर करतात रात्रीच्या समयी रुग्णालयाचे दरवाजे बंद करून आराम करतात.यामुळे रुग्णाची गैरसोय व हेळसांड होते त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यापूर्वी केली होती.त्यांना यावर कार्यवाही म्हणून तेर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले होते,परत त्यांना कळंब उपजिल्हा रुग्णालय येथे रुजू करून घेण्यास संजीत मस्के यांचा विरोध असून संबंधित डॉक्टर वर कार्यवाही करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
    या उपोषण प्रसंगी संजीत मस्के यांनी खालील मागण्या केल्या आहेत, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक देणारे डॉक्टर आणि नर्स,ब्रदर्सवर कारवाई करावी,ड्युटीच्यावेळी विशेषतः रात्री अनुपस्थित राहणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करावी,रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, कमिशनसाठी बाहेरील औषधालयातून गोळ्या-औषधे लिहून देणं बंद करून ते औषधे रुग्णालयात उपलब्ध करावे,रुग्णालयात X-ray, सिटी स्कैन,एमआराय,सोनोग्राफीसाठी लागणारे मशिनरी आणि त्याला पूर्णवेळ उपलब्ध असणारे टेक्निशियन कार्यरत करावे,
    सोमवारी आणि बुधवारी डोस घ्यायला येणाऱ्या गरोदर माता आणि बालकांना बसण्यासाठी सुविधा करावी,डिलिव्हरी झालेल्या मातांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना योग्य सुविधा मिळाव्यात,डलिव्हरी वार्डमध्ये पाण्याचा अभाव आणि रुग्णांच्या खाटाजवळ दुर्गंधी आणि अस्वच्छता असते.ज्यामुळे नवजात बालक आणि माता यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यामुळे स्वच्छता व पुरेसं पाणी नियमित असावे आदी मागण्याचा यात समावेश आहे.
error: Content is protected !!