August 8, 2025

मातंग समाजासाठी अनुदान,बीजभांडवल व थेट कर्ज योजनेसाठी अर्ज मागविले

  • धाराशिव (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म.रा.) मुंबईच्या वतीने जिल्हा कार्यालय धाराशिव येथे आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता विविध योजनांअंतर्गत लाभ घेण्यासाठी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
    या योजनांमध्ये तीन प्रमुख योजनांचा समावेश असून त्यामध्ये अनुदान योजना,बीजभांडवल योजना,तसेच थेट कर्ज योजना यांचा समावेश आहे.
    अनुदान योजना अंतर्गत प्रति प्रकल्प ५०,००० इतकी रक्कम असून त्यासाठी भौतिक उद्दिष्ट ७५ लाभार्थी व आर्थिक उद्दिष्ट ७.५० लाख इतके आहे.
    बीजभांडवल योजनेअंतर्गत प्रति प्रकल्प ७ लाख निधी असून त्यासाठी भौतिक उद्दिष्ट ७५ लाभार्थी व आर्थिक उद्दिष्ट ५२५.०० लाख निश्चित करण्यात आले आहे.थेट कर्ज योजना अंतर्गत १.०० लाख पर्यंतच्या प्रकल्पांसाठी ७५ लाभार्थी व आर्थिक उद्दिष्ट ७५.०० लाख आहे.
    या योजनांचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना स्वावलंबी बनविणे व उद्यमशीलतेला चालना देणे हा असून इच्छुक अर्जदारांनी तात्काळ संपर्क साधावा,इच्छुकांनी आपले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सांस्कृतिक सभागृहाजवळ,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,धाराशिव येथे प्रत्यक्ष संपर्क साधून सादर करावेत.असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.
error: Content is protected !!