September 24, 2026

भविष्यातील उज्वल यशासाठी चतु:सुत्री महत्वाची- जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी

  • लातूर – आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासातील सातत्य,वार्षिक नियोजन,नियमित वाचन व त्याचे विश्लेषण आणि योगा,प्राणायाम आणि व्यायाम या चतु:सुत्रीच अवलंब करावा तरच आपल्याला आपल्या जीवनात यशस्विता निर्माण करता येते असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी बोलताना व्यक्त केले.
    श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलीत महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आयक्युएसी आणि महात्मा बसवेश्वर करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एमपीएससी फाउंडेशन कोर्सच्या उद्घाटन समारंभामध्ये ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते तर विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक राहुल मिश्रा (बिहार),प्राचार्य प्रोफेसर डॉ.संजय गवई,मुख्य समन्वयक डॉ.भास्कररेड्डी नल्ला,समन्वयक डॉ.बाळासाहेब गोडबोले आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. भाऊसाहेब पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
    पुढे बोलताना सोमनाथ रेड्डी म्हणाले की,आपण आपल्या आई-वडिलांचे चेहरे बनले पाहिजे.यशप्राप्तीसाठी परिश्रम आवश्यक आहे.जीवनामध्ये आलेल्या नैराश्यावर आपण मात केली पाहिजे,असे सांगून ससा आणि कासव यांच्या कथेतील मतितार्थ त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
    प्रसिद्ध उद्योजक राहुल मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील विविध प्रश्न विचारून त्याची उत्तरे दिल्यानंतर त्यांना बक्षीसही दिले.
    कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की,महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारे चालणाऱ्या सर्व युनिटमध्ये समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते.महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता निर्माण व्हावी आणि या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांना आवश्यक ती कौशल्य मिळवून देण्यासाठी महात्मा बसवेश्वर करिअर अकॅडमीची निर्मिती करण्यात आली आहे.याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपले भविष्य उज्वल करावे,असेही ते म्हणाले.
    प्राचार्य प्रोफेसर डॉ.संजय गवई यांनी महात्मा बसवेश्वर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा,असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.राहुल डोंबे यांनी केले तर आभार प्रा.किसनाथ कुडके यांनी मानले.
    या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य प्रोफेसर डॉ.संजय गवई, समाजकार्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.दिनेश मौने,तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ.शितल येरुळे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कृष्णा धरणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
    या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!